बीड - उचल घेतलेली असतानाही ऊस तोडणीला येत नाही, म्हणून मुकादम आणि पोलिसांनी एका उसतोड मजूराला मारहाण केली होती. यानंतर या मजुराने आत्महत्या केली. त्यामुळे मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली. म्हणून संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी मृताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला होता. तसेच मुकादम आणि पोलिसांवर गुन्हा नोंद केला तरच मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील आसाराम सखाराम कवठेकर यांनी शुक्रवारी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, आसाराम यांना ऊसतोड मुकादम गणेश गिरी, विकास गिरी, सचिन गिरी (रा. आहेर चिंचोली) व बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी जरे आणि दुधाने यांनी ऊसतोडणीसाठी का येत नाही, म्हणून गावात येऊन मारहाण केली होती. मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने आसाराम यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांचे भाऊ किसन कवठेकर यांनी व गावकऱ्यांनी केली. मात्र, गेवराई पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून ठिय्या मांडला होता. रात्री उशीरापर्यंत हा ठिय्या सुरु होता.