बीड - ज्या चिमुकल्या मुलांचे जगाच्या पाठीवर कुणीच नाही, ज्यांच्या आयुष्यात एखाद्या अपघाताने आई-वडिलच हिरावून घेतले, अशा अनाथ मुलांचा सांभाळ बीडमध्ये सहारा अनाथालय संस्थेच्या माध्यमातून संतोष गर्जे हा तरुण करत आहे. विशेष म्हणजे, संतोष याची पत्नी प्रीती संतोष गर्जे हिने देखील या कामात स्वतःला वाहून घेतले आहे. आजघडीला संतोष यांनी सहारा अनाथालयाच्या माध्यमातून 111 मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे. आज जागतिक 'फादर्स डे' च्या निमित्ताने संतोष गर्जे यांच्या कार्याचा 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.
हेही वाचा - पुणे : 'मराठा क्रांती मोर्चा'चे प्रमुख आबा पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
जिल्ह्यातील गेवराईपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे यांचे सहारा अनाथालय आहे. येथे आजघडीला 111 अनाथ मुले वास्तव्य करतात. वयाच्या अठराव्या वर्षी घरातल्याच एका घटनेमधून संतोष गर्जे यांनी प्रेरणा घेऊन अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचे, अशी खूणगाठ मनाशी बांधली व आज संतोष गर्जे हे 111 अनाथ मुलांचे बाप आहेत.
..या घटनेतून घेतली संतोष यांनी प्रेरणा
संतोष गर्जे हा ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची, साधारणत: वीस-बावीस वर्षांपूर्वी संतोष गर्जे यांच्या विवाहित बहिणीचे निधन झाले. तिच्या छोट्या मुलाला संतोषचे वडील घरी घेऊन आले. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने आई-बापाचे छत्र हरवलेल्या भाच्याचे हाल संतोष यांनी डोळ्यांनी पाहिले होते. ते दुःख पाहून त्यांच्या मनात विचार आला की, समाजातील अशा अनाथ बालकांचे आयुष्य किती खडतर आहे. तेव्हाच त्यांनी ठरवले की, आपण या पुढचे सर्व आयुष्य अनाथ मुलांसाठी काम करायचे व त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी गेवराई येथे सहारा अनाथालय सुरू केले.
अनेक समाजातील दानशूर व्यक्तींची होते मदत
गेवराई येथील संतोष गर्जे यांच्या अनाथालयात दाखल असलेल्या मुलांना ना आई आहे, ना वडिलांचे छत्र. सहारा अनाथालयामध्ये दाखल असलेल्या मुलांमध्ये कोणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, तर काही मुलांची आई देह व्यवसाय करते, मग मुलाला बरोबर घेऊन जाणार कसे? म्हणून सोडून दिलेल्या मुलांचे संतोष गर्जे सांभाळ करत आहेत. मुलांच्या जेवणापासून ते राहण्यापर्यंतचा सर्व खर्च संतोष गर्जे हे करतात. यासाठी त्यांना अनेक समाजातील दानशूर व्यक्तींची मदत होते.
संतोष गर्जे यांच्या सहारा अनाथालयात आलेल्या मुलांना चांगले शिक्षण दिले जाते. भविष्यात तो मुलगा समाजात उभा राहू शकेल एवढी जबाबदारी सहारा अनाथालय घेते. मागील 17 वर्षांत सहारा अनाथालयात राहून शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहिलेली अनेक मुले आज समाजात काम करत असल्याचे मोठ्या अभिमानाने संतोष सांगतात. महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांमधील अनाथ मुले सहारा अनाथालयामध्ये राहतात. संतोष गर्जे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 'फादर्स डे' च्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.
दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
मागील वर्षभरात संतोष गर्जे हे अनेक वेळा संकटात सापडले. सहारातील 111 मुलांची सर्व जबाबदारी संतोष गर्जे यांच्यावर आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी सहारा अनाथालयाला मदत करावी, असे आवाहन संतोष गर्जे यांनी केले.
हेही वाचा - कोरोना लढ्यासाठी एनसीसी-एनएसएच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार - गिरीश बापट