बीड - जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी असंविधानिक भाषा वापरत महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्याच्या विरोधात महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे ग्रामीण भागातून काम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांची प्रचंड हेळसांड झाली.
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील तहसीलदार रूपा चित्रक यांनी पाटोदा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी आणि कैफियत मांडण्यासाठी कर्मचारी शुक्रवारी जिल्हाधिकारी पांडे यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांनी भेट नाकारली होती.
दरम्यान फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी आमदारांची भेट घेण्यासाठी महसूल कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात थांबले होते. त्यावेळी अस्तिक कुमार पांडे यांनी महसून कर्मचाऱ्यांना धमकावले तसेच त्यांचे म्हणणे देखील ऐकून घेतले नाही. याउलट मंत्र्याला भेटल्यास आत टाकेल, अशी भाष वापरली. त्यामुळे महसूल कर्मचारी संतप्त झाले आहेत.
महसूल कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध करत बीड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी, तलाठी संघटना, कोतवाल संघटना मंडळ अधिकारी एकत्र येत काम बंद आंदोलन केले. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान या आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांवर झाला. अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सातबारा आवश्यक होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळू शकला नाही. दुपारी २ वाजेपर्यंत ही आंदोलन मागे घेतलेले नव्हते. कदाचित जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली असती तर शेतकऱ्यांची हेळसांड झाली नसती, असे राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जोगदंड म्हणाले.