बीड - ऊसतोड कामगारांना सुरक्षितपणे घराकडे पोहोचवण्याच्या पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसे आदेशच मुख्य सचिवांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, ऊसतोड मजुरांचा गेल्या अनेक दिवसांपासूनचा संघर्ष आता संपला असून त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे, असे सांगत पंकजा मुंडे या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्यात कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाल्याने सर्वत्र संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्यांची तपासणी करुन सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली होती. गेल्या दोन तीन आठवड्यापासून त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत होत्या. निर्णयास विलंब होत असल्याने त्या आक्रमक झाल्या होत्या. त्यांच्या मागणीची दखल घेऊन शासनाने आज दुपारी यासंदर्भातील आदेशच मुख्य सचिव अजाॅय मेहता यांच्या स्वाक्षरीने निर्गमित केल्याने या लढयाला यश आले आहे. या आदेशामुळे अडकलेले सर्व कामगार आता आपापल्या मूळ गावी परतणार आहेत.
निर्णयाचे मनापासून स्वागत - पंकजा मुंडे
शासनाच्या या निर्णयाचे पंकजा मुंडे यांनी मनापासून स्वागत केले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लवादाचे नेते जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, की आता शांत आणि समाधानी वाटत आहे. माझे लोक घरी जातील. ऊसतोड कामगारांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे. त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे. ते आता घरी जाऊ शकतील. प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे घराकडे पोहोचवावे. कामगारांनी देखील प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे आणि आपापल्या घरी सुखरूप पोहोचावे. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी उसतोड कामगारांना केले आहे.