बीड - गेल्या मार्च महिन्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि बघता बघता बीड शहरात मोठी रुग्ण वाढ सुरू झाली. त्यामुळे रुग्णालयात आलेल्या रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी शासनाने अन्य कोरोना सेंटर उघडण्याची सूचना दिली. या सेंटरमध्ये ज्या सुविधा लागतात त्या सुविधा देण्याचे काम नगरपालिकेने आपल्या स्व: खर्चातून केले आहे. गेल्या एक वर्षापासून बीड शहरात उभारण्यात आलेल्या प्रत्येक सेंटरमध्ये गाद्या, बेडशीट, चादर, विद्युत पुरवठा यासह अन्य साहित्याची सेवा बीड नगरपरिषदेने पुरवली असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.
मार्च 2020ला कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था अपुरी पडू लागली. तेव्हा शासनाने कोरोना सेंटर उभारून त्या ठिकाणी रुग्णांची व्यवस्था करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या. बीडमध्ये जेथे सेंटर उघडण्यात आले त्या ठिकाणी बीड नगरपरिषदेने शहरात खंडेश्वरी भागात, पॉलिटेक्निक कॉलेज, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज आणि आयटीआय बॉईज हॉस्टेल येथील सेंटरवर 700 रुग्णांसाठी पुढाकार घेतला. तेथे बेड, गाद्या, उशा, बेडशीट, टेबल खुर्च्या, स्वच्छता साहित्य, निर्जंतुकीकरण यासह अन्य सुविधा देण्याची भूमिका पार पाडली. या सर्व सुविधा नगरपरिषदेने स्व: खर्चाने पुरवल्या आहेत. तसेच यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी सेन्टरवर दिवसरात्र काम करत आहेत. शहरात कंटेन्मेंट झोन करण्यासाठी पत्रे, बांबू व साहित्य पुरवले जाते, असे क्षीरसागर यांनी म्हटले.
जनजागृतीसाठी पुढाकार
कोरोनाबाबत जनजागृतीसाठी नगरपरिषदेने स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे. तसेच आतापर्यंत 2900 लिटर सोडियम हायपोक्लोराईड फवारणी केली आहे. यासाठी शासनाकडून अद्यापही कुठलाही निधी देण्यात आला नाही. अल्प उत्पन्न असलेली बीड नगरपरिषद नागरी सुविधा पुरवताना मोठी कसरत करत आहे. कर्मचारी, कामगारांना पगार देखील देणे मुश्किल झाले आहे. कोरोना सेंटरची व्यवस्था करण्यातच लाखोंचा निधी खर्च होत आहे. गेल्या वर्षभरापासून परिषदेने ही जबाबदारी पार पाडली आहे. आता रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने पालिकेला यासाठी वाढीव निधी दिला तर आणखी सुविधा उपलब्ध करून कर्मचाऱ्यांना मासिक वेतन देण्याची व्यवस्था करता येईल. कोरोना काळात सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शहरात दिवसरात्र काम केले आहे. नागरी सुविधा देण्यासाठी प्रत्येक कर्मचारी मनापासून काम करतो आहे. अशा वेळी शासनानेही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केली आहे.