आष्टी (बीड) - सध्याच्या परिस्थितीवर राज्य सरकारच कुठल्याच यंत्रणेवर नियंत्रण नाही, कोणते विभाग काम करतायत? कोणते विभाग झोपा काढतय हे पाहणे सरकारचे काम आहे. मात्र, या यंत्रणेवर कुठल्याही प्रकारचे कंट्रोल राज्य सरकारचे राहिलेले दिसत नसल्याने राज्याची अवस्था बिकट होत चालली आहे. इतकी सुस्त यंत्रणा मी माझ्या आयुष्यात मी पाहिली नाही, जनता अक्षरशः वाऱ्यावर सोडलेली असून सरकारची अवस्था आयाराम गयाराम सारखी झालेली असल्याचे टिकास्त्र आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारवर सोडले आहे.
आमदार धस यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वरुन बोलताना राज्य सरकारची सद्यस्थिती गोंधळलेली असल्याचे सांगत काही खासगी डॉक्टरांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडिसीवरची मागणी केली जात आहे. मात्र, रुग्णांना सरसकट रेमडिसीवर देण्याची आवश्यकता आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. विनाकारण पैशावाले रूग्ण असले की, सरसकट रेमडिसीवरची मागणी करायचा प्रकार काही ठिकाणी दिसत आहे. मात्र, अशावेळी ज्यांना खरच आवश्यकता आहे, असे गोरगरीब रुग्ण यामध्ये होरपळले जात आहेत. ते इंजेक्शन मिळत नसल्याची आर्त किंकाळी नातेवाईकांची आम्हाला अनुभववायला मिळते आहे, असे सांगत जामखेड येथील आरोळे रुग्णालयाच्या कोवीड सेंटरमध्ये अजूनही रेमडिसीवर वापरले गेले नाही. मात्र, सरसकट रेमडिसीवर पाहिजे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली नाही पाहिजे. ज्या रुग्णाला खरोखरच आवश्यकता आहे अशा रुग्णांना रेमडिसीवर देणे गैर नाही. यासाठी रुग्णाचा नेमका किती स्कोर असल्यावर रेमडिसीवर दिले पाहिजे हे तपासले जाणे गरजेचे असल्याचेही धस म्हणाले. काही खासगी दवाखान्यात अॕन्टीजन टेस्टचे किट दिसून येत आहेत. ते नेमके चोरी होतय का? विकले जातात याचा तपास करणे गरजेचे आहे. खासगी दवाखान्यात अॕन्टीजन करुन पॉझीटिव्ह आलेला रुग्ण चक्क घरी बसत आहेत, तर काही रुग्ण गावातच फिरत असल्याचीही बाब समोर येत आहे. कारण त्या रुग्णांची सरकार दप्तरी नोंदच होत नसल्याने ते मुक्तपणे संचार करत आहेत, असेही धस म्हणाले.
कोरोनाग्रस्त रुग्ण बरे देखील होत आहेत हा सकारात्मक विचार ठेवा. आज समाजात कोरोनाची मोठी भिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोरोनाने माणसात माणूस ठेवला नाही. सगळ्याच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले असल्याचे दिसून येत आहे. मात्र कोरोना झाला तरी बरा होतो, हा सकारात्मक विचार डोक्यात ठेवण्याची आज गरज असल्याचेही धस म्हणाले.