बीड - परतीच्या पावसामुळे बीड जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गेवराई तालुक्यातील पाचेगाव, पाडळसिंगी, पांढरवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नुकसानाचे पंचनामे करून मदत मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी सत्तार यांच्यासोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत संबधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (साेमवार) अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. गेवराई तालुक्यातील पाचेगाव, पाडळसिंगी, पांढरवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पिकांच्या झालेल्या नुकसानाची माहिती घेतली.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापूस, तूर व सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले आहे. ऐन हंगामात काढणीला आलेला कापूस खराब झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर, जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठे क्षेत्र आहे. मात्र यंदा परतीच्या पावसामुळे सोयाबीनचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. तर, अशा या संकटकाळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवा अशा सूचना सत्तार यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, शेतकऱ्यांना समृद्ध व सक्षम करण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.