अंबाजोगाई - वेळेवर निदान, योग्य औषधोपचार, योग्य आहार घेतल्यानंतर कोरोनावर मात करता येते, हे पुन्हा एकदा दिसून आले. तालुक्यातील आपेगावमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या सहा कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते या सहा जणांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद आरोग्य विभाग बीड आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट इंडियन असोसिएशन (इंडीया) संस्था अंबाजोगाई, यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मानवलोक संस्था अंबाजोगाई, ग्रामपंचायत आपेगाव आणि श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था यांच्या मदतीने श्री जयकिसान महाविद्यालयात ५० खाटांच्या कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. मंगळवारी या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असलेल्या 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या कोरोनामुक्तांचा राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
'रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच सर्वेत्तम मार्ग'
सध्या कोरोनावर म्हणावे तसे प्रभावी औषध उपलब्ध नाही, त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच सर्वेत्तम मार्ग आहे. योग्य आहार, हालका व्यायाम आणि औषधोपचाराने रुग्ण कोरोनावर मात करतो. आपेगावमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्णाला चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. रुग्ण देखील औषधोपचाराला चांगला प्रतिसाद देत असून, लवकर बरे होत आहेत. याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी दिली.
हेही वाचा - पहिल्याच दिवशी आर्थिक मदतीसाठी २२ हजार रिक्षा चालकांचे अर्ज