बीड - मागील १९ वर्षे माझ्यावर अत्याचार केले. आता माझ्या मुलीचीही मागणी ३ महिन्यांपूर्वी आमदाराने केली, असा खळबळजनक आरोप एका महिलेने केला आहे. ती मागणी पूर्ण केली नाही म्हणून माझ्यावर ३ लाख रुपये चोरल्याचा आरोप केल्याचेही तिने म्हटले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे महिलेने तक्रार दाखल केली आहे.
जिल्ह्यातील एका माजी आमदाराने घरात काम करणार्या महिलेवर मागील अनेक वर्षापासून वारंवार अत्याचार केला असल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना त्या पीडित महिलेने म्हटले आहे, की हे आमदार मला मध्यरात्री त्यांच्या घरी बोलवायचे. माझ्यावर त्यांनी अनेक वर्ष अत्याचार केला आहे. आता त्यांना माझी मुलगीही हवी होती. तीन महिन्यापूर्वी मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र, यांना मी म्हटले की, जे माझे झाले ते माझ्या मुलीचे होऊ देणार नाही आणि तसे करण्यास नकार दिला. या सगळ्या गोष्टीचा राग मनात धरूनच माझ्यावर ३ लाखांच्या चोरीचा आरोप केला असल्याचा आरोप त्या महिलेने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे.
दोन दिवसांपूर्वी एका माजी आमदाराच्या घरी ३ लाख रुपयांची चोरी झाली होती. ईटीव्ही भारतशी बोलताना पीडित महिला म्हणाली, की मी कधी चोरी केली नाही. मी त्यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी नोकरीला होते. मात्र, अनेक वर्षे माझ्यावर अन्याय झाला आहे. याची दखल पोलिसांनी घ्यावी व मला न्याय द्यावा, अशी मागणी तिने केली आहे. त्या महिलेच्या या आरोपामुळे सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सदरील प्रकरण चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.