बीड - मागील अनेक दिवसापासून दिवसागणिक काही पैशांनी डिझेल, पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होत आहे. एक जून ते 24 जून या 24 दिवसात 8 रुपये 14 पैशांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये डिझेलदेखील त्याच तोडीत वाढत आहे. बुधवारी पेट्रोलचा भाव 87 रुपये 39 पैसे तर डिझेल 77 रुपये 86 पैसे प्रति लिटर होता. राज्यातील रोजगार व इतर क्षेत्रातील मंदी लक्षात घेता वाढत असलेले डिझेल-पेट्रोलचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या पचनी पडत नसल्याने नागरिकांमध्ये या दरवाढीबद्दल रोष असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मागील तीन महिने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन होता. या काळात अनेक नागरिकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. आता बाजारपेठ खुली झालेली आहे, मात्र म्हणावी तशी आर्थिक उलाढाल होत नाही. सगळीकडे आर्थिक संकट ओढवलेले असताना शासनाने डिझेल व पेट्रोलच्या दरात कमालीची वाढ केलेली आहे.
मागील 24 दिवसांमध्ये पेट्रोलमध्ये आठ रुपये 14 पैशांची वाढ झाली असल्याचे बीड येथील जाधव पेट्रोल पंप व्यवस्थापक लक्ष्मण जोगदंड यांनी सांगितले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. डिझेल-पेट्रोलचे भाव वाढल्याने ट्रान्सपोर्टचा खर्च वाढतो व इतर वस्तू देखील महाग होतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे मेटाकुटीला आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे दर कमी असतानाही हे सरकार मात्र राज्यात पेट्रोलचे दर वाढवत आहे. असेच जर दर वाढत राहिले तर आम्हाला शंभर रुपये लिटरने पेट्रोल घ्यावे लागेल की काय, अशी भिती आता वाटू लागली असल्याचे बीड शहरातील नागरिकांनी सांगितले.