बीड - राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना स्थलांतर करावे लागत आहे. अशा वाईट परिस्थितीतही मुख्यमंत्री जनादेश यात्रा काढून सबंध महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करतात. एवढेच नव्हे तर फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला. त्यामुळे फडणवीस सरकार हे फसवे सरकार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी शनिवारी अंबाजोगाई येथील शिवस्वराज्य यात्रेदरम्यान केला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे शनिवारी शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. प्रारंभी अंबाजोगाई शहरातून मोटारसायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी पक्षाकडून केज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. मंचावर जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, प्रदेश युवक अध्यक्ष महेबूब शेख, रुपाली चाकणकर, नमिता मुदडा, अक्षय मुदडा, नंदकिशोर मुदडा यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, अठरापगड जातीला विचारात घेऊन पुढे जाण्यासाठी आपण तयार आहोत. देशातल्या कुठल्याही धर्मांध शक्तीला जनतेने थारा देऊ नये, असे सांगत धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, राज्यात विहिरीवर शेततळे दिले असे मुख्यमंत्री महाराष्ट्रभर सांगत आहेत. मात्र, खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या ना विहिरी पोहोचल्या आहेत ना, शेततळे पोहोचले आहेत. अनेक शेतकऱ्यांना दुष्काळामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला. या सगळ्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडून आणायचा असेल तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले. केज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता मुंदडा यांना सहकार्य करण्याचे आवाहन धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी नागरिकांना केले.