बीड - पाऊस पडल्यानंतर पिंपळवंडीच्या शेतकऱ्याने या ६६६ बाजरी महागुजरात या कंपनीची बाजरीची एक बॅग पेरली. मात्र, पेरलेली बाजरी उगवलीच नाही. हा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. शेतकरी विश्वास बहिरवाळ यांनी कृषी विभागाकडे याबबात तक्रार करत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
दुष्काळात पिचलेला शेतकऱ्याची फसवणूक होत आहे. बीड येथील श्री साई सेल्स अँड ऍग्रो एजन्सी यांच्याकडून विश्वास बहिरवाळ यांनी ६६६ बाजरी महागुजरात या कंपनीची एक पिशवी ४ हजार ४०२ रुपयाला खरेदी केलेली आहे.
बोगस बियाणांचा मोठा गोंधळ संपूर्ण मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरलेले उगवलेच नसल्याचा प्रकार बीड तालुक्यातील पिंपळवंडी येथे समोर आला आहे. सोमवारी पिंपळवंडी येथील शेतकरी विश्वास बैरवाल यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. बोगस बियाणे देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी विश्वास बहिरवाळ यांनी केली आहे.
तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. बीड जिल्ह्यात गत आठवड्यात काही दुकानदारांचे सॅम्पल जिल्हा कृषी विभागाने घेतले होते. या बियाणांची तपासणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात दाखल झाले असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. एकंदरीत विश्वास बहिरवाळ यांच्या तक्रारीवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.