बीड - पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहिण भावामध्ये श्रेयवाद पेटला असल्याचा प्रत्यय आज बीडमध्ये आला. परळी वैजनाथ येथील पंचायत समिती इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी होणार होते. त्याअगोदरच पंचायत समितीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन केले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे ८ सदस्य आहेत. तर भाजपचे ४ सदस्य आहेत. यापूर्वी देखील परळी शहरातील ५ कोटीच्या रस्ता उद्घाटनाचे काम असो की, ग्रामीण भागातील विकासाची कामे असो, उद्घाटनासंबंधी श्रेय घेण्यावरून वाद झालेला आहे.
धनंजय मुंडेंनीच केला पाठपुरावा - पंचायत समिती सदस्य (काँग्रेस आणि राष्ट्रवादी)
परळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून सभापती उपसभापती यांच्यासह १२ सदस्यांपैकी ८ सदस्य आघाडीचे आहेत. पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत असावी यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र, केवळ श्रेय लाटण्याच्या हेतूने मुख्य शासकीय कार्यक्रमात राजशिष्टाचार न पाळता कार्यक्रमाचे आयोजन उद्या शुक्रवारी करण्यात आले आहे. त्याचा निषेध म्हणून पंचायत समिती आघाडीच्या सदस्यांनी आज सायंकाळी इमारतीचे उद्घाटन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी- पंचायत समिती सदस्य (भाजप)
"पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या अधिकृतपणे परळी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण होत असून कावेबाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज घाईघाईने केलेले उदघाटन हास्यास्पद असून शुध्द वेडेपणाचे आहे. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा" असा उपरोधिक टोला भाजपचे पंचायत समितीचे सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे, मोहनराव आचार्य व रेणूका फड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.