परळी (बीड) - राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रूग्ण व निर्माण झालेली गंभीर परिस्थिती यावर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी कोविड लसीकरण मोहिम आणि रूग्णांच्या प्रभावी उपचार अंमलबजावणीसाठी सूचना केल्या आहेत.राज्यात १ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या कार्यक्रमात वयाची अट नसावी कारण प्रत्येकाला स्वतःचे जीवन सुरक्षित करण्याचा अधिकार आहे, असेही या पत्रात पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.
या आहेत सूचना
लसीकरण कार्यक्रमाची माहिती गावांमध्ये देण्यासाठी सरकारी यंत्रणे एवढी दुसरी कोणतीही प्रभावी यंत्रणा नसते. त्यामुळे या यंत्रणेचा उपयोग करावा, आरोग्य विभागाच्या समवेत ग्रामविकास खात्याच्या ग्रामपंचायत, महसूल विभागाच्या तलाठी आणि नगरविकास विभागाच्या वॉर्ड कार्यालयापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत सर्व यंत्रणा या कार्यक्रमात सज्ज कराव्यात, लसीकरणाचे केंद्र हे जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून गर्दी कमीत कमी होईल. जे नागरीक कोविडबाधित आहेत परंतु त्यांना लक्षणे नाहीत त्या नागरीकांना गावामध्ये आयसोलेशनच्या संदर्भात निर्णय घेणे जास्त सोयीचे ठरेल. अशा विविध सूचना पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे केल्या आहेत.