बीड -आता आष्टी आणि पाटोदा येथे नगराध्यक्ष म्हणून आमदार सुरेश धस कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आष्टी, पाटोदा नगरपंचायतीची निवडणूक सव्वा वर्षापूर्वी झाली होती, या नगरपंचायती आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आहेत. आष्टी येथे पल्लवी धोंडे तर पाटोदा येथे सय्यद खतिजाबी अमर यांची नगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
नगराध्यक्षांचे राजीनामे - नगराध्यक्ष पदाचा कालावधी अडीच वर्षाचा असला तरी पक्षीय पातळीवर सुरुवातीलाच सव्वा वर्ष प्रत्येकाला संधी असे राजकीय समीकरण ठरले होते. त्यामुळे आता सव्वा वर्षे होताच पल्लवी धोंडे (आष्टी) आणि सय्यद खतीजाबी अमर (पाटोदा) यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
पाटोद्याला मराठा कार्डला मिळणार का संधी? - नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष निवडीत मराठा समाजावर झालेला अन्याय सुरेश धस या वेळेस पुसून काढणार का? पुढील राजकीय दृष्ट्या आमदार सुरेश धस नक्कीच मराठा कार्डचा उपयोग पाटोदा नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी करतील यात शंका उरलेली नाही, जर यावेळेस मराठा कार्ड डावलला तर पुढील निवडणुकीवेळी परिणाम होऊ शकतो. यामुळे विचारपूर्वक पाटोदाचा नगराध्यक्ष निवडला जाईल, असे मत स्थानिक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
आष्टी, पाटोद्यामध्ये संधी कुणाला? - आष्टी, पाटोद्याच्या नगराध्यक्षांनी राजीनामे दिल्यानंतर आष्टी आणि पाटोदा येथे नवीन नगराध्यक्ष कोण याची चर्चा जोरदार सुरू आहे. आष्टीत सुरेश धस यांचे कट्टर समर्थक असलेले जिया बेग यांच्या मातोश्री आयेशा इनायतयल्ला बेग यांना अध्यक्षपदाची संधी दिली जाईल अशीच शक्यता सर्वाधिक आहे. तर पाटोद्यात यावेळी मराठा समाजाला संधी द्यावी असा सूर आहे. एका ठिकाणी अनेक इच्छुक आहेत, त्यामुळे सामाजिक समतोल सांभाळून आमदार सुरेश धस निर्णय घेतील, असे स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -