बीड - जिल्ह्यातील एकूण १६ कापूस खरेदी केंद्रांवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी यांची पुढील आदेशापर्यंत ग्रेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, परळी वै.जिल्हा बीड यांच्या नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज करायचे आहे. 26 मेपासून हे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित मुंबई यांच्यामार्फत शासकीय हमीभावाने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, ग्रेडरची संख्या कमी असल्यामुळे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात विलंब लागत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर म्हणून कृषी विभागाचे कृषी पदवीधर कर्मचारी, अधिकारी यांना कापूस ग्रेडींगचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर म्हणून नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यांची नावे व नमूद केल्याप्रमाणे संबंधित खरेदी केंद्र यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाचे २० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची जिनिंग ट्रेनिंग सेंटर नागपूर येथे ४ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.