बीड- नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पाय उतार होताना बीड नगर परिषदेवर उर्दूतून नाम फलक ( Urdu board on Beed nagarpalika ) लावला. तसेच संपूर्ण शहरात सहा दिवसाआड नळांना पाणी पुरवठा करण्याची पत्रकबाजी केली. यामुळे शहरातील जनतेने हुरळून जाण्याचे कारण नाही, अशी खोचक टीका एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक यांनी केली.
एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक यांनी दिलेल्या निवेदनात ( Beed AIMIM president ) म्हटले, की आगामी येऊ घातलेल्या बीड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांसमोर जाऊन मतांचा जोगवा मागण्यासाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी खेळी केली ( AIMIM slammed Bharatbhushan Khirsagar ) आहे.
नगरपरिषदेत प्रशासकाची नियुक्ती-
माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जवळपास गेल्या 30 ते 35 वर्षांपासून अपवादात्मक कालावधी वगळता बीड नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. या काळात त्यांनी बीडची जनता आणि बीड शहरासाठी नेमके किती चांगले व किती खराब काम केले ? हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. सध्या बीड नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आलेले आहे. यामुळे त्यांना नगराध्यक्षपदाची खुर्ची सोडावी लागली.
माजी नगराध्यक्षांकडून नजरेत धूळफेक
मुदत संपण्यापुर्वी नेहमीसारख्या त्यांच्या स्टाईलने शहराच्या विविध भागात रस्ते व नाल्यांच्या कामांचे उद्घाटन करण्याचा सपाटा हाती घेतला होता. याबाबत त्यांचा इतिहास साक्ष आहे की, ते जर डझनभर उद्घाटन करत असतील तर त्यातून दोन कामेसुद्धा पूर्णत्वास जात नाही. उद्घाटन करून फक्त जनतेच्या डोक्यात आणि नजरेत धूळफेक करण्याचे कार्य नेहमीप्रमाणे यंदाही त्यांनी केल्याचे एमआयएमआयएमचे अध्यक्ष यांनी म्हटले.
हा भेदभाव नाही तर काय आहे ?
जातीनिहाय भेदभाव तर केलाच शिवाय उच्चभ्रू , मध्यमवर्गीय आणि गोरगरीब असा भेदभावही केला. म्हणूनच आज बीड शहरामध्ये प्रतिष्ठितांच्या व दलित-मुस्लिम वगळता इतर वसाहतीमध्ये टकाटक रस्ते व नाल्या दिसून येतात. तिथे गेल्या अनेक वर्षांपासून पाच-सहा दिवसाआड नळांना पाणी सोडले जाते. मध्यमवर्गीय, हातावर पोट असणाऱ्या तसेच दलित-मुस्लिम वसाहतींमध्ये रस्ते आणि नाल्यांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी केलेला भेदभाव स्पष्टपणे नजरेत येतो. चालायला धड रस्ते नाहीत. जागोजागी खड्डेच खड्डे, नाल्या बांधलेल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहते. तसेच नळांना १५ किंवा २० दिवसाआड नळांना पाणी दिले जाते. हा भेदभाव नाही तर काय आहे ? असा प्रश्न एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक यांनी उपस्थित केला.
नगर परिषदेवर उर्दूतून नामफलक लावण्यावरून राजकारण
गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मोहम्मदीया कॉलनी , राजू नगर , मोमिनपुरा , गांधी नगर येथील स्थानिक नागरिकांनी पावसाळ्यात हाल अनुभवले आहेत. नगराध्यक्षांनी पाच वर्षाच्या कार्य काळाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला की काय असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. बीड नगर परिषदेवर उर्दूतून नामफलक लावण्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी एआयएमआयएम पक्षाने उर्दूतून नाम फलक लावण्याची मागणी केली ( urdu board controversy in Beed ) होती.
राज्यातील दुकानांना मराठी पाटी लावणे सक्तीचे
काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक दुकानावर मराठी पाटी ( Marathi Boards on Shops ) मोठ्या अक्षरात असली पाहिजे याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, काही विशिष्ट वर्गातली लोक राज्य सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आहेत. या वर्गाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Alligation On BJP ) यांनी केला आहे. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे प्रत्येक नागरिकांची आणि आस्थापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारने केलेला कायदा हा बंधनकारक असल्याचे नवाब मलिक यांनी नुकतेच मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.