बीड - जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून सुनावणीदरम्यान मला अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार बीड येथील विधिज्ञ एल. आर. गंगावणे यांनी राज्याच्या निवडणूक विभागासह वकील संघाकडे केली आहे. या तक्रारीनंतर उच्च न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचेही ॲड. गंगावणे यांनी म्हटले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 'लॉयर्स सोशल फोरम'च्या वतीने दिलेल्या तक्रार अर्जावर एकूण 25 वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड येथील ॲड. एल. आर. गंगावणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वडवणी नगरपंचायतीच्या आरक्षण सोडती संदर्भाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर बाजू मांडत असताना जिल्हाधिकारी रेखावार यांनी ॲड. गंगावणे यांना एकेरी भाषेत उल्लेख करून आक्षेपार्ह वक्तव्य केले, असे निवडणूक आयोग यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सुनावणी दरम्यानचे मागवले सीसी टीव्ही फुटेज
यावेळी ॲड. गंगावणे म्हणाले की, जर वकिलांना जिल्हाधिकारी साहेबांकडून अशी वागणूक मिळत असेल तर ही बाब चुकीची आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवलेले आहेत. एकंदरीत या प्रकरणात केवळ माझाच अपमान झालेला नाही तर आमच्या संपूर्ण वकिलांच्या भावना यामुळे दुखावले आहेत. याबाबत हे प्रकरण आम्ही उच्च न्यायालयापर्यंत घेऊन जाणार आहोत. असेही यावेळी गंगावणे म्हणाले. याबाबत बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बाजू समजून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.