बीड - मागील 8 दिवसापासून जिल्ह्यातील अवैध वाळू साठ्यावर पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. शनिवारी बीड शहरातील उत्तम नगर भागाच्या पश्चिमेला अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद रानडे यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणी वाळू माफियांनी 150 ब्रास वाळूचा साठा केला होता. पोलिसांनी छापा टाकलेली वाळू शासकीय विश्रामगृह परिसरात साठवली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वसंत बबनराव कदम यांच्या मालकीची 150 ब्रास वाळू बीड शहरातील उत्तम नगरच्या पश्चिमेला साठवून ठेवली असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील संतोष बन, नितीन जोगदंड सचिन सानप यांनी वाळू साठ्यावर छापा टाकला. त्यानंतर पकडलेली वाळू शहरातील शासकीय विश्रामगृहात आणण्यात आली.
या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे. ज्या जागेत वाळू ठेवली होती. ती जागा देखील वसंत बबनराव कदम यांच्याच नावावर असल्याचे महसूल विभागातील पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात वाळू साठ्यांवर छापा टाकण्यासाठी पथके तयार करण्यात आली असली तरी शेकडो ब्रास वाळूचा साठा करेपर्यंत जिल्हा प्रशासन काय करते? असा सवाल उपस्थित होत आहे.