औरंगाबाद - राज्यात भीषण दुष्काळ असून सरकार सर्वांना टँकरने पुरवठा होत असल्याचा दावा करत आहे. मात्र, औरंगाबादमध्ये पाण्यासाठी होणारी कसरत पाहिल्यावर हा दावा किती खरा आहे, हे कळते. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरिबांवर चक्क रेल्वेत स्वच्छतागृहात वापरण्यात येणारे पाणी चोरून भरण्याची वेळ येत आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबादेत सुरू आहेत. जून महिन्यात 1130 टँकर सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, तरीही नागरिकांवर पाण्याची चोरी करावी लागत आहे. मुकुंदवाडी रेल्वे स्थानकासमोरील वस्तीतील लोकांना पाणी मिळत नसल्याने चक्क रेल्वेचे पाणी चोरण्याची वेळ आली आहे.
सोमवारचा दिवस म्हणजे शाळेला सुट्टीनंतर जाण्याचा पहिला दिवस. मात्र, मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाच्या समोरील वस्तीत राहणाऱ्या सिध्दार्थ ढगेला पहा.. हातात दप्तर आणि पुस्तके असायला हवी होती मात्र, पाणी टंचाईने त्याच्या हातात पाण्याचे रिकामे जार उचलण्याची वेळ आणली आहे. दहा वर्षांचा सिद्धार्थ शाळेऐवजी पाणी भरण्यासाठी जातोय तेही रेल्वेत. ऐकायला किंवा पाहायला जड जाणारी ही वस्तुस्थिती असली तरी हेच वास्तव आहे. परिसरात पाण्याची सोय नसल्याने सिध्दार्थला पाण्यासाठी बाहेर पडावे लागते.
पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने सिद्धार्थला जवळ असलेल्या रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहात वापरण्यात येणार पाणी चोरून भरतो. रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या हैद्राबाद पॅसेंजरचा आधार घ्यावा लागतो. पाच किलोमीटरवर असलेल्या मुख्य रेल्वे स्थानकावर या रेल्वेत बसून जायचे, बसताना हातात दोन मोठे जार घ्यायचे, मुख्य स्थानकावर गाडी थांबली, की बाजूला असलेल्या पाईपमधून, ज्या पाईपमधून रेल्वेच्या शौचालयात पाणी भरले जाते, त्या पाईपमधून पाणी भरायचे. अवघी दहा मिनिटे गाडी स्थानकावर थांबते. या दहा मिनिटात मिळेल तितके पाणी भरायचे आणि त्याच गाडीने परत मुकुंदवाडी स्थानकावर काही मिनिटांसाठी गाडी थांबल्यावर खाली पाण्याची भांडी घेऊन उतरायचे, अशी जीवघेणी कसरत सिध्दार्थला या कोवळ्या वयात करावी लागत आहे.
सिद्धार्थच्या घरी आजारी वडील, नुकतीच बाळंत झालेली आई, आणि चार भावंडे असे कुटुंब. त्यामुळे पाण्यासाठी बाहेर पडण्याची जबाबदारी सिध्दार्थवर येते. पाणी भरण्यासाठी बाहेर पडलेला सिद्धार्थ घरी येईपर्यंत त्याच्या आईच्या मनात भीती असते. परंतु, परिस्थिती बेताची असल्याने पाणी विकत घेता येत नाही आणि लहान मुलीला सोडून घरातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी चालणारी कसरत नाईलाजास्तव पाहण्याची वेळ सिध्दार्थच्या आईवर येते.
एकटा सिध्दार्थ नाही तर मुकुंदवाडी रेल्वे स्थानकासमोर असलेल्या वस्तीत राहणाऱ्या सर्वच लोकांना रेल्वे स्थानकावरून चोरून पाणी भरावे लागते. रेल्वेची वेळ तशी दुपारी अडीच वाजताची. गाडीची वेळ झाली की पटरीजवळ असलेल्या एका झाडाखाली परिसरातील लोक हंडे, पाण्याचे जार घेऊन वाट बघत बसतात. गाडी कधी वेळेवर येते तर कधी दोन तास, कधी तीन तास उशिरा येते. मात्र, पाण्याची तहान भागवण्यासाठी हे सर्व नागरिक वाट पाहतात, दोन मिनिटे ही गाडी मुकुंदवाडी स्थानकावर थांबते. त्या वेळेत मिळेल त्या दरवाजाने आत जाण्याची कसरत ही लोक करतात आणि कसेबसे पाणी भरून परततात. कधीतर रेल्वे पोलीस पाण्याने भरलेली भांडी पायाने लाथ मारून सांडून शिवीगाळ करत असल्याचा अनुभव नागरिक सांगतात. हा अनुभव सांगताना त्यांच्या भावना देखील अनावर झाल्या.
मुळात जीवघेणी कसरत करून भरलेले हे पाणी पिण्यायोग्य नाही, रेल्वेची स्वच्छता करणे, स्वच्छता गृहात वापर करण्यासाठी असलेले हे पाणी, त्यात पाणी घेण्यासाठी असलेले पाईप देखील खाली घाणीत पडलेले असतात. त्यामुळे हे पाणी आरोग्यास किती घातक आहे, याची कल्पना न केलेली बरी.
मिळालेले पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. मात्र, दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असलेले हे लोक मिळालेले पाणी तसेच पितात. याचा परिणाम आरोग्यावर होईल याची बहुदा जाणीव नसावी. मात्र, कसेबसे पाणी भरून परततात.
मराठवाड्यात काही वर्षांपूर्वी लातूरकरांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी देण्यात आले होते. मात्र, औरंगाबादच्या या छोट्याशा वस्तीतील लोकांना याच रेल्वेत बसून पाणी चोरून आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळात टँकर देण्याचा दावा करणाऱ्या सरकारचा दावा किती फोल आले हे समोर येत आहे.