औरंगाबाद- पर्यटनाची राजधानी म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. अनेक देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने रोज जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना हजेरी लावतात. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून आजपासून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे आणि देवस्थाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे, अनेक पर्यटकांना आल्या पावली माघारी जावे लागत आहे.
जिल्ह्यातील अजिंठा, वेरूळ, बीबी का मकबरा, पाणचक्की ही सर्व पर्यटन स्थळे आजपासून बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील एका ५९ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका ३६ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पर्यटनस्थळांना बंद ठेवण्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली होती. ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी पर्यटकांची संख्या वाढण्याचा काळ असतो त्या काळात पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, पर्यटन स्थळांवर आधारित असणाऱ्या उद्योगांना याचा फटका बसणार आहे.
हेही वाचा- राज्यात 'आणखी' एक कोरोनाबाधित रुग्ण; राज्यातील एकूण संख्या 32 वर पोहोचली