गडचिरोली - तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला जखमी केले. ही घटना शुक्रवारी आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा जंगल परिसरातील क.क्ष.६७ मध्ये घडली. शिलाबाई गोपाल गुरनुले रा.आष्टा असे जखमी महिलेचे नाव आहे.
वडसा वनविभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून तेंदुपाने संकलन सुरू करण्यात आल्याने अनेक महिला, पुरूष जंगलात सकाळी तेंदुपाने संकलनासाठी जात आहेत. मात्र, या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिलाबाई गुरनुले या गावातील लोकांसोबत तेंदुपाने संकलनासाठी रवी अरसोडा जंगल परिसरात गेल्या होत्या. तेंदुपाने तोडत असताना झुडपात लपून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला. महिलेने आरडा-ओरड केल्यामुळे तिच्या शेजारी असलेल्या लोकांनीही आरडा-ओरड करून मदतीला धावले. त्यामुळे वाघ पळून गेला. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रवी जंगल परिसरात वाघाचा वावर कायम असून महिनाभरापुर्वी याच जंगलात वाघाने आरमोरी येथील एका इसमावर हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे वनविभागाने वाघांचा वावर असलेल्या क्षेत्रात वनकर्मचाऱ्यांसोबत गावातील काही युवकांची मदत घेऊन पहाराही दिला होता.