औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मारहाण करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. पाच जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून दोघे अजून फरार आहेत. अटक केलेला एक जण अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी सोडून आहे.
औरंगाबादच्या अण्णाभाऊ साठे चौकात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना अडवल्याने पोलीस आणि लोकांमध्ये बाचाबाची झाली. यातूनच टवाळखोरांनी पोलिसांनाच मारहाण केली आणि ते फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी पथक निर्माण करत या हल्लेखोरांना अटक केली.
दुचाकीवर ट्रिपलसीट निघालेल्या तिघांना घराबाहेर का पडलात, अशी विचारणा करताच अल्पवयीन बालकासह बापलेक व एकाने वाहतूक पोलिसांशी वाद घालून काठीने मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना काही पोलिस कर्मचाऱ्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली, तर महिला पोलिसांनी या मुजोरांना तीव्र विरोध केला. हा खळबळजनक प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौकात गुरुवारी दुपारी पावणेबारा ते साडेबाराच्या सुमारास घडला. या मारहाणीत वाहतूक शाखेचे शिपाई जनार्दन जाधव हे जखमी झाले आहेत.
दरम्यान, सिटीचौक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी शेख फारुख शेख कादर (५२) आणि शेख शाहरुख शेख फारुख (२४, दोघेही रा. रोजेबाग, ईदगाह) या बापलेकाला अटक केली आहे. तर शेख साजीद शेख फारुख व शेख समीर शेख सलीम हे दोघे पसार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी अधिक कडक करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱयांना पोलीस अटकाव करत आहेत. बुधवारीदेखील पोलिसांनी ट्रिपलसीट जाणाऱया सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यानंतर आज दुपारी पावणेबारा ते साडेबाराच्या सुमारास वाहतूक शाखा व सिटीचौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी अण्णाभाऊ साठे चौकात बंदोबस्तासाठी कार्यरत होते. त्यावेळी एका दुचाकीवर (एमएच-२०-एआर-०३८०) अल्पवयीन बालकाला पाठीमागे बसवून शेख साजीद व शेख समीर असे ट्रिपलसीट जात होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले. त्याचा राग आल्यावर शेख साजीद याने पिता शेख फारुख व भाऊ शेख शाहरुख यांना बोलावून घेतले. त्यानंतर हे दोघेही बुलेटने (एमएच-२०-एफएफ-६४६४) अण्णाभाऊ साठे चौकात आले. त्यानंतर या पाचही जणांनी वाहतूक शाखेचे शिपाई जनार्दन जाधव यांच्या हातातील काठी घेऊन त्यांनाच मारहाणीला सुरूवात केली.
सदर प्रकार पाहून त्यांच्या मदतीला महिला कर्मचारी धावून गेली, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी प्रतिकाराला सुरुवात केली. पण तोपर्यंत जाधव हे जबर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने पोलिसांनी त्यांना तत्काळ घाटीत दाखल केले. हा प्रकार घडताच शेख बापलेकांनी तेथून पळ काढला. पण हा प्रकार एका कॅमेऱयात कैद झाला होता. त्यामुळे हल्लेखोरांच्या दुचाकींचे क्रमांक त्यात कैद झाले होते. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरुन तिघांचा शोध घेत त्यांना अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. याप्रकरणी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.