औरंगाबाद - घाटीतील महिला डॉक्टरला चाकूचा धाक दाखवत दोघांनी फरपटत नेल्याची घटना घाटीमध्ये 11 ऑक्टोबरला घडली होती. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हे शाखेने सोमवारी (दि.12 ऑक्टोबर) एका आरोपीस अटक केली होती. सागर हिम्मतराव दाभाडे (वय-21 वर्षे, रा. गुलाबवाडी, जयभीम नगर टाऊन हॉल), असे आरोपीचे नाव आहे. गुन्ह्याचे कलम जमीनपात्र असल्यामुळे आरोपीच्या वकिलाने जामीन मागितला होता. मात्र, सरकारी वकिलांचा युक्तीवाद ऐकत न्यायालयाने त्याचा हा जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
घाटीमधून आपले काम संपवून एक महिला डॉक्टर वसतिगृहाकडे मध्यरात्री जात असताना दोघांनी चाकुचा धाक दाखवत तिला फरपटत नेले. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक करत बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मंगळवारी (दि. 13 ऑक्टोबर) आरोपीला न्यायालयात हजर केल्यावर जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीच्या वकिलांनी सुरुवातीला जामीन मागितला. पण, सरकारी वकील अमेर काझी यांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करत आरोपीला जमीन देऊ नये, अशी मागणी केली. त्यावर न्यायमूर्ती बी.डी. तारे यांनी तपास अधिकारी यांना बोलवत काही ताशेरे ओढले. सरकारी वकील अमेर काझी यांनी या गुन्ह्यामध्ये आणखी काही कलमे वाढवावीत, असा युक्तीवाद केला. न्यायालयाने सरकारी वकिलाचा युक्तीवाद ग्राह्य धरत जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
हेही वाचा - नियुक्तीसाठी मराठा विद्यार्थ्यांचे न्यायालयात जाणे चुकीचे, ही सरकारची जबाबदारी- विनोद पाटील