औरंगाबाद - राज्यात महायुतीत झालेल्या फाटाफुटीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या युतींचे भवितव्य अडचणीत सापडले आहे. सहा महिन्यांवर आलेल्या औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीतील युती संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - उमेदवारी अर्ज भरताना हयात असणाऱ्या अपत्यांनाच गृहीत धरा; औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
गेल्या तीस वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना - भाजपची युती अस्तित्वात आहे. औरंगाबाद महानगरपालिकेत खऱ्या अर्थाने राज्यातील युतीचा पाया रचला गेला. मात्र, राज्यात युती अडचणीत सापडल्याने औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत युती होणे आता जवळपास अशक्य असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभेत आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपची युती झाल्याने औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत देखील पुन्हा युती होईल, असा विश्वास युतीच्या स्थानिक नेत्यांना होता. गेली तीस वर्षे औरंगाबाद महानगरपालिकेत युतीने सत्ता उपभोगली. युती आणि मित्रपक्षांना सोबत घेत कधी सेनेचा तर कधी भाजपचा महापौर विराजमान होत राहिला. मात्र, राज्यात युतीत झालेली बिघाडी पाहता औरंगाबादच्या स्थानिक नेत्यांचे पुन्हा युतीत लढण्याचे स्वप्न धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यात आता महानगरपालिकेत प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याने शिवसेना आणि भाजपला पालिका ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आणि त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा काही फायदा होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असल्याचं राजकीय अभ्यासकांनी सांगितले.