औरंगाबाद - शिवसेनेच्या वतीने राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या नावाच्या जयघोषाला विरोध केल्याने शिवसैनिकांच्या भावना दुखवल्याचे आमदार डॉ. अंबादास दानवे व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या वतीने औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार डॉ. अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बाळासाहेब सानप यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. कोणतेही चांगले काम करताना सर्वसामान्य मराठी माणसाच्या तोंडातून महाराजांचा जयघोष निघाल्याशिवाय राहणार नाही. त्यात महाराजांच्या वंशजांनी जयघोष केला तर कुठे बिघडले, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ज्या महाराजांचे नाव घेऊन निवडणुकीत प्रचार केला. त्याच महाराजांचे नाव घेतल्यावर भाजपला त्रास होतोय का? महाराजांचे नाव नुसते निवडणुकीपूरते घेतले होते का?, असा प्रश्नही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला.
खैरे पुढे म्हणाले, आम्ही देखील खासदार झाल्यावर दिल्लीत शपथ घेताना शिवाजी महाराजांचा जयघोष केला होता. मात्र, आम्हाला कोणी अडवले नाही. देशासाठी राज्यसभेचे सभागृह मोठे आहे. मात्र, त्याहून मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आहे. नायडू यांनी केलेल्या वक्तव्याने देशातील अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे व्यंकय्या नायडू यांनी सर्वांची माफी मागायला हवी, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ अंबादास दानवे यांनी केली.
काय आहे प्रकरण..?
उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे उपराष्ट्रपती नायडू यांनी त्यांना समज दिली होती. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर, हे कोणाचे घर नाही, माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, असे नायडू यांनी उदयनराजे यांना म्हणाले होते.