छत्रपती संभाजीनगर : Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठवाड्यातील संभाजीनगरात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संजय राऊत हे उपस्थित राहणार असल्यानं मोठी चर्चा घडून आली होती. आता त्यावर खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. मी पत्रकार परिषदेला येत असल्याच्या बातमीमुळे सगळे अस्वस्थ होते. मात्र, मी गेलो नसल्यानं त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. मी येणार या बातमीनं पोलिसांची फौज उभी करण्यात आली होती, असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठक घेऊन नागरिकांना काय दिलं, असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला.
कोविडमध्ये लोकांचे प्राण वाचवले : मागील अडीच वर्षे यांनी माशा मारल्या अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. आम्ही राज्य चालवत होतो, आम्ही कोविड काळामध्ये लोकांचे प्राण वाचवत होतो, आम्ही महाराष्ट्राला दिशा देत होतो, महाराष्ट्राला आधार देत होतो. मृतांचा खच गंगेत वाहत होता आणि गुजरातच्या साबरमती नदीवर चिता पेटत होत्या, तेव्हा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व लोकांना दिलासा देत होतं. लोकांच्या भूक आणि या चुली पेटलेल्या राहतील, हे पाहत होतो. लोकांचे प्राण वाचत होतो, तुम्ही जर याला माशा मारत आहे, असं म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
फडणवीस यांनी जातीचं राजकारण केलं : देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याकडं गांभीर्यानं पाहायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस राज्यातील वैफल्यग्रस्त नेतृत्व असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं राजकारण जातीचं आणि सूडाच आहे. बदल्याच्या भावनेचं, महाराष्ट्राच्या एकात्मतेला सुरुंग लावण्याचं राजकारण गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे झालं. 2024 मध्ये ते चक्र पूर्ण होईल, त्यांच्यावर ते राजकारण हळूहळू उलटताना दिसतय. याचे परिणाम महाराष्ट्राबरोबर देवेंद्र फडणवीस भोगत आहेत. राज्य कसं करतात, हे आम्ही दाखवून देऊ. आम्हालाही राज्य करता येतं, तुमच्यापेक्षा अधिक कठोर पद्धतीनं ते आम्ही दाखवू, माझ्यावर किती कारवाया केल्या, माझं काळीज तुमच्यासारखं उंदराचं नसून वाघाचं आहे. तुम्ही मला तुरुंगात टाकलं, खोटे खटले दाखल केले, मी घाबरत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
शिवसेनेला आधीच दिलासा : आमदार अपात्रतेच्या कारवाईबाबत सुनावणी सुरू आहे. तर पक्ष, नाव आणि चिन्ह याबाबत सुनावणी होईल, त्यावर बोलताना शिवसेनेला दिलासा मे महिन्यातच मिळाला असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. मुख्य न्यायाधीशांनी स्पष्ट निर्देश दिले की हे सरकार राज्यातील बेकायदेशीर आहे. त्याचे प्रतोद भारत गोगावले बेकायदेशीर आहेत, तर त्यांनी जारी केलेले व्हीप देखील बेकायदेशीर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपद हे बेकायदेशीर आहे. हे सरकार गेलेलं आहे, मात्र तुम्ही आता फेविकॉल लावत बसला आहात. त्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागवा लागेल असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव करण्याचं श्रेय महाविकास आघाडी सरकारचं आहे, त्याचं श्रेय तर आम्हाला द्या. पाच मिनिटात नाव बदलली जातात, याआधी असं झालेलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आर्थिक फसवणूक बाबत एसआयटी स्थापन करावी : आदर्श पतसंस्था घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांना न्याय कसा देता येईल, हे पाहायला हवं. सरकार फालतू गोष्टीसाठी SIT स्थापन करते. आमची चौकशी लावण्यासाठी SIT स्थापन केली. लोकं भेटायला आले तर जनतेचे प्रश्न ऐकायला वेळ नाही, तर मग इथं काय पंगती झोडायला आले का? जेवणावळी करायला की पंचतारांकित हॉटेलचा पाहुणचार घ्यायला आलात असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी केला. पोलीस बळाचा सामान्य नागरिकांवरच वापर करतात. अंतरवाली सराटी इथच्या आंदोलकांवरही लाठीचार्ज झाला होताच ना, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
हेही वाचा :