औरंगाबाद : योगगुरू रामदेव बाबा यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात मुस्लिम आणि इसाई धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप समाजवादी पक्षाकडून करण्यात आला. या प्रकरणी औरंगाबादेतील सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. लवकर कारवाई झाली नाही तर समाजवादी पक्ष नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरेल, असा इशारा शहर अध्यक्ष फैसल खान यांनी दिला.
रामदेव बाबांवर कारवाई करा : समाजवादी पक्षाचे शहाराअध्यक्ष फैसल खान यांनी आरोप केले आहेत की, योगगुरू रामदेव बाबा यांनी राजस्थान येथे एका धार्मिक कार्यक्रमात बोलताना मुस्लिम समाजाविरोधी वक्तव्य केले. मुस्लिम बांधवांचा पोशाख, दाढी, नमाज पठण पद्धतीवर त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. यासह ईसाई धर्माबाबत देखील वक्तव्य करत मेणबत्ती लावण्याच्या पद्धतीवर टीका केली. बाबा रामदेव यांच्या वक्तव्याने दोन्ही धर्माच्या भावना दुखावल्या आसल्याने व त्यांनी दोन्ही धर्मातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, व तातडीने अटक करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. ही तक्रार समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष फैसल खान यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सिटीचौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना दिली आहे.
महिलांबाबत याआधी केले वक्तव्य : योगगुरू बाबा रामदेव यांनी याआधीही अनेक वेळा आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. महिलांबाबत त्यांनी बोलत असताना संतापजनक वक्तव्य त्यांनी केले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. या विधानाचा समाजातून तीव्र विरोध करायला पाहिजे होता. मात्र तसे झाले नाही, महिलांचा अवमान करणाऱ्या या बाबावर तातडीने कारवाई करा. रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीचे उत्पादन नागरिक वापरत आहेत. त्याच्यामुळे त्यांना मोठा फायदा होतो असे उत्पादन वापरू नये, त्यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी आपल्या निवेदनातून करण्यात आली आहे. लवकरात लवकर कारवाई झाले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष फैसल खान यांनी दिला.
नमाज अदा करा, मग मनात येईल ते करा : धार्मिक मेळाव्याला संबोधित करताना योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, समाजात सगळीकडे पाप वाढत आहे. हे पाप पुसण्याचे काम मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना करावे लागणार आहे. एका विशिष्ट धर्मावर भाष्य करताना ते म्हणाले की, जर तुम्ही कोणत्याही मुस्लिमाला त्याचा धर्म काय म्हणतो असे विचाराल तर तो म्हणेल की दिवसातून ५ वेळा नमाज पठण करा आणि मग तुमच्या मनात येईल ते करा. म्हणजेच पाहिजे तितके पाप करा. त्यांना इस्लामचा अर्थ फक्त नमाज म्हणून समजतो. ते म्हणाले की मुस्लिम न चुकता नमाज अदा करतात कारण त्यांना तेच शिकवले जाते. पण हिंदू धर्मात हे शिकवले जात नाही.