गंगापूर (औरंगाबाद) - दुर्मीळ असणारा कृष्णशीर्ष म्हणजेच ग्रामीण भाषेतील काळतोंड्या जातीचा साप गंगापूर शहरातील शिक्षक कॉलनी येथे आढळला आहे. सर्पमित्र गणेश साळुंके यांनी त्याला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
शहरातील शिक्षक वसाहत भागात साप निघाला आहे, असे निसर्गप्रेमी आशिष दापके यांनी फोनवरून सर्पमित्र गणेश साळुंके यांना सांगितले. साळुंके यांनी तत्काळ तेथे जाऊन बघितले असता अत्यंत दुर्मीळ असा कृष्णशीर्ष जातीचा बिनविषारी, साधारण तीस सेंटिमीटर लांबीचा साप तेथील गवतात लपलेला आढळून आला. सर्पमित्र साळुंके यांनी सापाला हाताने अलगद उचलून एका प्लास्टिक बरणीत बंद केले. तेथील जमलेल्या नागरिकांना त्या बिनविषारी सापाची अभ्यासपूर्ण माहिती सांगितली. जवळच निसर्गाच्या सानिध्यात त्या सापाला सुखरूप सोडून दिले.
या सापाचे नाव कृष्णशीर्ष असून ग्रामीण भाषेत त्याला काळतोंड्या, असे म्हणतात. याचे इंग्रजी नाव 'ब्लॅक हेड' असे आहे. पूर्ण वाढ झालेल्या सापाची लांबी जास्तीत जास्त ४५ सेंटिमीटर असते. रस जाडी ५ मी.मी इतकी बारीक असते. हा साप अत्यंत दुर्मीळ असून फक्त महाराष्ट्रातच तुरळक ठिकाणी गवताळ भागात आढळतो. हा बिनविषारी साप असून याचे खाद्य किडे-मुंग्या आहेत.