औरंगाबाद - कोरोनाचे सावट अजून जिल्ह्यातून गेले नाही आहे. त्यातच शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने प्रशासनाच्या वतीने गणपती मंडळाने काय करावे आणि काय जर नये असे आदेशच जारी केले आहे. त्यामुळे बहुतांश मंडळांनी यंदा गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ५७७ गणेश मंडळांनी यंदा मूर्तीची स्थापना न करण्याचा निर्णय ग्रामीण पाेलिसांना कळवला आहे. तर २१ ऑगस्टपर्यंत १३२ सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नाेंदणी केली आहे. तसेच सर्वत्र ड्रोनची नजर असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
औरंगाबाद ग्रामीण पाेलिसांनी यंदा कराेनाची परिस्थिती पाहता मूर्तीची स्थापना न करण्याबाबत आवाहन केले हाेते. त्याला जिल्ह्यातील ५७७ मंडळांनी प्रतिसाद दिल्याचे ग्रामीण पाेलीस मुख्यालयाकडून सांगण्यात आले. त्यातच ग्रामीण भागात वैजापूर, पैठण, सिल्लाेड शहर,येथे प्रत्येकी राज्य राखीव बल स्ट्रायकिंग फाेर्सची एक प्लाटून कंपनी, कन्नड शहर, गंगापूर येथे दंगा काबू पथकाची प्रत्येकी एक प्लाटून कंपनी, पाेलीस अधीक्षक स्ट्रायकिंग फाेर्स, अप्पर पाेलीस अधीक्षक स्ट्रायकिंग फाेर्स, नियंत्रण कक्ष राखीव अंतर्गत तीन दंगा नियंत्रक पथक, उपअधीक्षक, उपविभागीय पाेलीस अधिकारी असे सात, १८ पाेलीस निरीक्षक, ३६ सहायक पाेलीस निरीक्षक, ६६ पाेलीस उपनिरीक्षक, १२५७ पाेलीस कर्मचारी, ३०० हाेमगार्ड, एसआरपीएफची एक कंपनी, असे साधारण ग्रामीण पाेलिसांच्या बंदाेबस्ताचे स्वरुप राहणार असल्याचे सांगण्यात आले.
शहरात रॅपिड अॅक्शन फाेर्स, एसआरपीएफच्या कंपन्या, ३५० हाेमगार्ड, सर्व पाेलीस उपायुक्त, सहायक पाेलीस आयुक्त, पाेलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, कर्मचारी असे बंदाेबस्त रचनेचे स्वरुप राहणार आहे. यंदा मिरवणुकांना परवानगी नाहीच. गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्राेनचाही आवश्यकतेनुसार वापर करणार असल्याचे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
कोराेनामुळे गणेश मंडळांनी मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे, सोशल डिस्टेनसिंग तसेच मास्कचा वापर, अशा नियमांचे पालन करावे, सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीची उंची चार फूटा पेक्षा कमी तर घरगुती मूर्ती दाेन फुटांच्या आत असावी, आराेग्याबाबत जनजागृती करून आराेग्य तपासणी, रक्तदान आदी शिबिरे आयाेजित करण्यासारखे उपक्रम मंडळामार्फत घेण्यात यावे तसेच, दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन करावी, तर विसर्जनासाठी नदी, विहिरी, तलावांवर जाऊ नये, मिरवणूक एकत्रितरीत्या काढू नये, अशा सूचना केलेल्या आहेत.