औरंगाबाद - कोरोनाग्रस्त रुग्णाबाबत अफवा पसरवणाऱ्या दोघांवर औरंगाबादेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीनंतर एमआयडीसी सिडको पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- 'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा
औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात कोरोनाची लागण झालेल्या महिलेवर उपचार सुरू आहेत. मात्र, ही महिला मृत झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णालय आणि बाधित महिलेच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत असल्याने खासगी रुग्णालयाने पोलिसात याबाबत तक्रार दिली होती.
रविवारी औरंगाबादमधे एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या महिलेवर उपचार सुरू असून ती महिला सुखरुप आहे. मात्र, व्हाट्सअॅपवरील एका ग्रुपवर महिलेचा मृत्यू झाल्याचे मॅसेज प्रसारीत झाला. त्यामुळे अशी अफवा पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. विशेष म्हणजे खोटी माहिती पसरवणाऱ्यामध्ये त्या ग्रुपमधील एक सदस्य स्वतः डॉक्टर आहे. ही खोटी माहिती प्रसिद्ध झाल्याने खासगी रुग्णालय आणि महिलेच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे खासगी रुग्णालयाच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहे.