औरंगाबाद - निजामाकडून हस्तांतरीत झालेल्या सेंट्रल व दक्षिण सेंट्रल रेल्वेच्या मालकीची हजारो चौरस मीटरची जागा बळकावण्याचा डाव रेल्वे प्रशासनाने उधळून लावला. ही जागा बळकावण्यासाठी नगर भूमापनच्या तत्कालीन भ्रष्ट अधिकाऱ्यांनी एका दाम्पत्याच्या नावे पीआर कार्ड तयार केले होते. पण हा प्रकार चव्हाट्यावर आल्यावर रेल्वे प्रशासनाने अखेर सोमवारी नगर भूमापनच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह दाम्पत्याविरुध्द सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.
केशरसिंगपुरा येथील दिलीपसिंग याने जुना सर्व्हे क्रमांक २-१, २-२, ३ व ४ नुसार सध्या रेल्वेच्या ताब्यात असलेली जागा त्यावेळी निजाम सरकारने ताब्यातून घेतली होती. तेव्हा निजाम सरकार रेल्वे चालवत होती. त्यावेळी ताब्यातील ही जागा रेल्वे हॉटेल अशी होती. याच जागेला निजामांनी औरंगाबाद हॉटेल असे केले. पुढे १९४८ नंतर ही जागा भारतीय रेल्वेकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर १९६६ मध्ये रेल्वेचे विभाजन झाले. त्यावेळी ही जाग दक्षिण मध्य रेल्वे नावाने हस्तांतरीत झाली.
१९७० ते ७१ मध्ये सिटी सर्व्हे कार्यालय अस्तित्वात आले. त्यानंतर या मालमत्तेला २०२९५ असा सिटी सर्व्हे क्रमांक देण्यात आला. त्यावर मालक म्हणून सेंट्रल रेल्वे / साऊथ सेंट्रल रेल्वे असा उल्लेख करण्यात आला. एक लाख ४६ हजार स्क्वेअर मीटर अशी ही जागा दर्शविण्यात आली. यापैकी ५८ हजार ५९९ स्क्वेअर मीटर एवढी जागा रेल्वेने टुरिझम विभागाला दिली. त्याला २०२९५/२ असा सिटी सर्व्हे क्रमांक देण्यात आला. त्याचवेळी वेगळे पीआर कार्ड देखील तयार करण्यात आले. तर उर्वरीत ४१ हजार ४४७ स्क्वेअर मीटर ही जागा राहिली.
२२ ऑगस्ट २०१२ ला नगर भूमापन विभागाने जागा मोजल्यावर काही जागा रोड रुंदीकरण, विहीर व पाईपाईनमध्ये गेली. त्यामुळे जागा शिल्लक असल्याचे दर्शविण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये विद्या भालचंद्र कुलकर्णी या नावे रेल्वे प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली. या नोटीसीमध्ये ही जागा ताब्यात घेऊ नये असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना नोटीसचा धक्का बसला. त्यांनी या संदर्भात भूमापन विभागाकडून जागेची माहिती मागवली. त्यावेळी चौकशी रजिस्टरमधून सेंट्रल गव्हर्नमेंट / साऊथ सेंट्रल रेल्वेचे नाव खोडल्याचे समोर आले.
रेल्वेच्या जागेची नोंद असलेल्या रजिस्टरवर खाडाखोड करण्यात आली होती. तर भालचंद्र कुलकर्णी नावाने रेल्वेच्या जागेचे पीआर कार्ड तयार करण्यात आले होते. तसेच विद्या कुलकर्णी हिने एसपीएलसीएस क्रमांक ९४५ / २०१८ मध्ये नकाशा सादर केला होता. ही जागा रेल्वे प्रशासनाची असल्याने भालचंद्र कुलकर्णी, विद्या कुलकर्णी व नगर भूमापनच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचे त्यावरून निदर्शनास आले. त्यानंतरच २२ ऑगस्ट २०१२ नंतर कुलकर्णी दाम्पत्याने अतिक्रमणाचा प्रयत्न केल्याचेही समोर आले. या प्रकरणी कुलकर्णी दाम्पत्यासह नगर भूमापनच्या तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक काशीनाथ महांडूळे करत आहेत.