औरंगाबाद - वैजापूर येथे काळविटाची शिकार करून मेजवानी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. वन विभागाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव शिवारातील त्रिभुवन वस्ती येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तरुणांनी काळवीटाची शिकार करून मेजवाणी केली होती. या मेजवानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. वीरगाव पोलिसांनी तातडीने या ठिकाणी छापा मारून संजय बाबुराव त्रिभुवन, गुलाब बाळासाहेब फुलारे या दोघांना ताब्यात घेतले. तर नानासाहेब सोपान परडे, सचिन अशोक त्रिभुवन, रवी एकनाथ त्रिभुवन हे तिघे पोलिसांना पाहून फरार झाले.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी वनविभागाच्या स्वाधीन केले असून त्यांच्याकडून एका हरणाचे मास, कातडी, शिंगे व हत्यारे वनविभागाने जप्त केली आहेत. हरणाची शिकार करून मेजवानी करणारे सर्व आरोपी हे हनुमंतगाव येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी वन अधिकारी सोमनाथ आमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना वैजापूर येथील न्यालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.