मुंबई - बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या राणीबागेत पेंग्विनने दोन पिलांना जन्म दिला आहे. ही पिल्ले आता मोठी झाली आहेत. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने १८ जानेवारीला पेंग्विनच्या पिल्लाचे आणि वाघाच्या बछड्याचे नामकरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
मागील महिन्यात २३ डिसेंबरला पेंग्विनच्या पिलांचे बारसे केले जाणार होते. मात्र कोरोनाचा प्रसार वाढल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
राणीबागेत पेंग्विन, वाघाचा जन्म -
राणी बाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रालयात २६ जुलै २०१६ रोजी ८ पेंग्विन आणण्यात आले. त्यानंतर लगेच एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. राणीबागेतील दोन पेंग्विन माद्यांनी पिल्लांनाही जन्म दिला आहे. डेसी नावाच्या मादीने अंड दिले होते. त्यातून १ मे २०२१ मध्ये एका पिल्ल्याचा जन्म झाला. तर फ्लिपर नावाच्या मादीच्या अंड्यातून १९ ऑगस्ट २०२१ मध्ये अजून एका पिल्लाचा जन्म झाला. त्यामुळे राणीबागेतील पेंग्विनची संख्या आता नऊ झाली आहे. तसेच राणीबागेत आणलेल्या वाघांच्या जोडीने बछढ्याना जन्म दिला आहे. या बछड्याचे नामकरणही केले जाणार आहे.
राणीबागेतील प्रथा-परंपरेनुसार पेंग्विन पिल्लांचे नामकरण -
राणीबागेतील हत्तींची अनारकली व लक्ष्मी तर एका गेंड्याचे शिवा हे नामकरण करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता पेग्विन पिल्लांचे नामकरण करण्यात येणार आहे. या नामकरणासाठी पाहुणे म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राणीबागेत अशा प्रकारचा प्रथमच महापौरांच्या उपस्थितीत असा नामकरण सोहळा होणार आहे.
हेही वाचा-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतले एन.डी. पाटील यांचे अंत्यदर्शन; म्हणाले...
पेंग्विनवरून विरोधकांची शिवसेनेवर टिका -
राणीबागेत पेंग्विन आल्यावर एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता. तसेच पेंग्विन कक्ष उभारण्याचे काम एका काळ्या यादीतील कंत्राटदाराला देण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून सत्ताधारी आणि पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली गेली होती. पेंग्विनच्या वाढत्या देखभाल खर्चावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेला भाजपसह विरोधकांकडून लक्ष्य केले गेले आहे. पेंग्विनचे बारसे केले जाणार असल्याने या सोहळ्यावरून विरोधकांना पुन्हा टीकेची संधी चालून आली आहे.