औरंगाबाद - कोरोनाबधित रुग्ण आढळून आल्यावर त्याच परिसरात जाऊन त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. महानगरपालिका या तपासण्या करणार असल्याची माहिती महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ईटीव्ही भारतला दिली.
अहवाल येईपर्यंत त्या लोकांना होम क्वारंटाईन केले जाईल. अहवाल पॉझिटीव्ह आला तर पुढे लगेच त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आणि प्रकृती अस्वस्थ असेल तर घाटी रुग्णालयात हलविण्यात येईल. हॉटस्पॉटमध्ये जाऊन तपासणी करण्यासाठी महानगर पालिकेने चार पथके तयार केल्या असल्याची माहिती डॉ. पाडळकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालय आता रुग्णांना ठेवणे शक्य नसल्याने एमआयटी कॉलेज जवळ, देवगिरी महाविद्यालय, नौखंडा महाविद्यालय आणि एमजीएम अशा चार ठिकाणी कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. ज्यात जवळपास दोन हजार रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल, अशी माहिती देखील डॉ. नीता पाडळकर यांनी दिली आहे.
रुग्णांना अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करा, सोशल मीडियावर नाही
कोरोना संसर्ग झालेल्या एका रुग्णाने गैरसोय होत असल्याबद्दल सोशल मीडियावर आपला व्हिडिओ टाकला होता. याबाबत डॉ. पाडळकर म्हणाल्या, आलेले संकटाबाबत काहीही माहिती नसताना काही अंदाज नसताना आरोग्य विभाग आपले प्रयत्न करत आहे. काही अडचणी आहेत त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. मात्र. याबाबत सोशल मीडियावर काही टाकण्यापेक्षा आम्हाला थेट संपर्क केला तर समस्या सोडवता येईल. सोशल मीडियावर असे काही टाकल्याने अनेक अडचणींचा सामना करून काम करणाऱ्या लोकांचे मनोबल खचले जाईल त्यामुळे अस करु नये, असे मत डॉ. नीता पाडळकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - लॉकडाऊनचा साइड इफेक्ट : मोबाईल-टीव्ही स्क्रिनच्या अतीसंपर्काने डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ