पैठण (औरंगाबाद) - झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना महामारीने पैठण तालुक्यात शंभरी पार केली आहे. मागील दोन दिवसात तालुक्यात 21 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागाचा समावेश असून, चितेगाव येथील एका फार्म कंपनीमध्ये तब्बल 18 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र दिसत आहे.
पैठण शहरात नेते, अधिकारी, व्यापारी आणि पत्रकारांसह नागरिकांचे एकमत करत 14 जुलैपासून 20 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायती स्तरावर लॉकडाऊनचा ज्या त्या ग्रामपंचायतींवर निर्णय सोडण्यात आले होते. काही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत आपल्या ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला, मात्र औद्योगिक क्षेत्र असलेले चितेगाव ग्रामपंचायतीने हा निर्णय धुडकावत औद्योगिक क्षेत्र सुरूच ठेवले.
औरंगाबाद शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याने इथून ये-जा करणाऱ्या मजुरांमुळे हा प्रादुर्भाव वाढला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. चितेगाव येथील औद्योगिक क्षेत्रात एका फार्मा कंपनीमध्ये तब्बल 18 रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. सोबतच बिडकीन 2, बाबुळगाव 4, शेकटा 1, कृष्णपूर 1 आणि इसारवाडी 2 याप्रमाणे तालुका क्षेत्रात कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत असून, लोकांना बचावासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.
दरम्यान, पैठण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात लाँकडाऊन करण्याची गरज आहे. त्या विषयावर येत्या एक ते दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.