औरंगाबाद - महाराष्ट्राचा युवक सांगतो 10 रुपयांची भीक आमच्या समोर टाकण्याइतका महाराष्ट्र भिकारी झालेला नाही. मनगटात ताकद आहे. हिम्मत द्यायचीच असेल, तर 10 रुपयांच्या थाळीची भीक देऊ नका. आमच्या हक्काचा रोजगार द्या. रोजगार दिला, तर 10 रुपयाची काय, 100 रुपयांची थाळी घेण्याची आमची कुवत आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या 10 रुपयांच्या थाळीवर हल्लाबोल केला. पैठण विधानसभेचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी गागाभट्ट चौकात खासदार कोल्हेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
सरकारकडे रोजगार मंत्रालय आहे. या रोजगार मंत्रालयाने काय केले? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. युती सरकारने कर्जमाफीच्या फुसक्या गप्पा मारून लोकांना ऊल्लू बनवले. कोणालाच कर्जमाफीचा फायदा झाला नाही. या सरकारमुळे उलट राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, या फसव्या आश्वासन देणाऱ्या सरकारला झोप लागली होती का? असा सवाल देखील कोल्हे यांनी यावेळी उपस्थित केला.
हे वाचलं का? - पवार साहेबांनी काय केलं हे 'उपऱ्यां'नी विचारू नये; मोदी-शाहांवर कोल्हेंचा निशाणा
मत मागण्यासाठी आधी ऑनलाईन अर्ज करा -
शेतकऱ्याचे कर्ज माफीसाठी एक नाही, तर 66 किचकट अटी ऑनलाईन अर्जासाठी टाकल्या. आता मत मागायला शिवसेना, भाजपचे लोक येतील त्यांना सांगा आधी ऑनलाइन अर्ज करा. येतांनी आधार कार्ड सोबत आना. मग मत मागायला या, तेव्हा आम्ही विचार करून मतदान करू. आम्ही कर्ज माफी मागायला दारात आलो होतो. तेव्हा वेळ तुमची होती. आता आमची वेळ आहे, असे ठणकावून सांगा, अशी युक्ती देखील यावेळी अमोल कोल्हे यांनी सांगितली.
हे वाचलं का? - किती बी ताण येत नाही बाण; अमोल कोल्हेचा शिवसेनेवर घणाघात
जाहिरात बघून सरकार विकत घ्यायचे नसते -
'हिच वेळ आहे महाराष्ट्र घडवण्याची' अशी जाहिरातबाजी शिवसेना करते. मात्र, जाहीरात बघून साबण, तेल विकत घ्यायचे असते. सरकार नाही, असा टोला देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी लगावला. त्यातच विद्यमान सरकार म्हणतंय राम मंदिर बांधू. मात्र, निवडणुकीमध्ये राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. राम मंदिर झालेच पाहीजे. मात्र, आधी शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा. राम मंदिर बांधून तरुणांना रोजगार मिळणार आहे का? शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का? असा प्रश्न देखील खासदार कोल्हेंनी यावेळी उपस्थित केला.