औरंगाबाद - माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आई आणि माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी त्यांच्या सुनेच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सून संजना जाधवने आपल्याला शिवीगाळ केली असून आपल्या जीवाला धोका होऊ शकतो असे तक्रारीत म्हणलं आहे. संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.
संजना यांच्या सांगण्यावरून हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, काहीतरी करून अडकवून ठेवायचे म्हणून दानवे यांच्याच सांगण्यावरून हे सर्व केले जात असल्याचा आरोप हर्षवर्धन यांच्या आई तेजस्विनी जाधव यांनी केला.
'हर्षवर्धन जाधव यांचं लग्न ठरवताना रावसाहेब दानवे यांची भविष्यात मदत होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. आजपर्यंत मदत तर झालीच नाही, पण काही ना काही अडचणी आणण्याचे काम त्यांनी केले. आमच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. त्याची तक्रार आम्ही दिली. मात्र, अचानक हर्षवर्धनवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व फक्त दानवे यांच्या सांगण्यावरून झाले आहे,' असा आरोप तेजस्विनी जाधव यांनी केला.
'माझी सून संजना सकाळपासून मला शिवीगाळ करत आहे. तिला दानवे यांची फूस आहे. त्यामुळे हे होत आहे. तिच्याकडून माझ्या जीवाला धोका असल्याने मी तक्रार देत आहे,' असे त्यांनी सांगितलं.
तेजस्विनी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात संजना जाधव यांच्या विरोधात तक्रार (NC) दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'मेडिकल वेस्ट'पासून बनवल्या शोभेच्या शेकडो वस्तू; जळगावातील डॉ. रेणू नवाल यांची किमया
हेही वाचा - समुद्र किनारी लागली आग; चार बोटींसह लाखोंची मासळी जळून खाक