औरंगाबाद - कोरोनामुळे लग्न सोहळे रद्द झाल्याने अनेकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यात आता लॉकडाऊन संपला तरी दिवाळीपूर्वी विवाह मुहूर्त नाहीत असे वाटत असताना विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण यंदा पावसाळ्यातही अनेक मुहूर्त असल्याची ज्योतिषांनी जाहीर केले आहे. यावर्षी मे, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातदेखील विवाह मुहूर्त आहेत. ग्रहमान पाहता यावर्षी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता ज्योतिषाचार्यांना आली होती. त्यामुळे 2019 मध्ये झालेल्या बैठकीतच यावर्षी पावसाळ्यात मुहूर्त असणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. असे मुहूर्त नेहमी असतात मात्र पर्जन्य ऋतूत हे मुहूर्त काढत नव्हते. मात्र, आपत्कालीन वेळेत हे मुहूर्त काढण्याचा निर्णय झाला असल्याचे वेदमूर्ती ज्योतिषाचार्य आनंत पांडव गुरुजी यांनी दिली.
जगात कोरोनाचे संकट दाट होत चालले आहेत. त्यात भारतात मार्च, एप्रिल, मे महिन्यात प्रामुख्याने लग्नसराई असते. मात्र, कोरोनामुळे ठरलेली लग्न थांबवावी लागली आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत आता लग्न होणार नाहीत असे चित्र असल्याने यावर्षी दिवाळीपर्यंत लग्न होणार नाहीत असे म्हटले जात होते. कारण आजपर्यंत जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये लग्नाचे मुहूर्त नसतात अशी धारणा होती. मात्र, यावर्षी ज्योतिषांनी या महिन्यांमध्ये आपत्कालीन मुहूर्त जाहीर केले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पावसाळ्यात लग्नाचे मुहूर्त असल्याने खोळंबलेले विवाह आता होऊ शकतात, अशी माहिती औरंगाबादचे वेदमूर्ती ज्योतिषाचार्य आनंत पांडव गुरुजी यांनी दिली.
यावर्षी मे महिन्यात 02/05/06/08/12/14/17/18/19/20/24/31 असे 12 मुहूर्त आहेत. जून महिन्यात 01/02/11/14/15/25/29/30 असे 8 मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात 02/07/08/11/12/13/17/23/26/29/31 असे 11 मुहूर्त आहेत तर ऑगस्ट महिन्यात 02/04/08/13/30/31 असे 6 मुहूर्त आहेत. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यातही विवाह असल्याने ज्यांचे विवाह स्थगित झालेत त्यांनी या मुहूर्तांचे विचार करायला हरकत नाही. विवाह मुहूर्त असले तरी विवाह सोहळे पार पडत असताना सोशल डिस्टन्स पाळावा लागणार आहे हे मात्र नक्की.