छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation Protest : मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात संतप्त झालेल्या तरुणानं अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या पाल फाटा इथं शनिवारी घडली. वरुण पाथ्रिकर असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सुरुवातीला चार तास आंदोलन शांततेच्या मार्गानं सुरु होतं. मात्र अचानक हा प्रकार घडल्यानं मोठी धावपळ उडाली. इतर आंदोलकांनी तरुणाला अटकाव केल्यानं पुढील अनर्थ टळला.
आंदोलनाची देण्यात आली होती हाक : शुक्रवारी रात्री जालना जिल्ह्यात आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक केली. मात्र यात कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे फुलंब्री तालुक्यात पाल फाटा इथं मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आलं. रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यावर जवळपास चार तास शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरू राहिलं. आंदोलनात सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली.
तरुणानं अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न : पाल फाटा इथं शांततेत आंदोलन सुरु असताना अचानक वरुण पाथ्रिकर हा तरुण डिझेलची बाटली घेऊन आंदोलनात आला. त्यानं अंगावर डिझेल ओतून घेतलं. ही बाब इतर आंदोलकांना लक्षात येताच त्यांनी त्याला अडवलं. त्याच्या हातातील डिझेल असलेली बाटली त्यांनी ओढून घेतली आणि पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे आंदोलनात आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या वरुण पाथ्रिकर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आंदोलनात केली जनजागृती : आंदोलन सुरू झाल्यावर मुख्य रस्ता अडवण्यात आला. त्यावेळी वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांनी जनजागृती मोहीम राबवली. सरकारनं आरक्षण द्यायला हवं, असा संदेश यावेळी देण्यात आला. तर काही युवकांनी आंदोलन सुरू असताना मुंडण करून सरकारचा निषेध नोंदवला. शुक्रवारी शिष्टमंडळ जात असताना सातारा परिसर इथं देखील सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सहा युवकांनी मुंडण केलं. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी आंदोलन उभारण्यात आलं आहे. काही ठिकाणी तर अन्नत्याग आंदोलन सुरू करून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जात आहे.
हेही वाचा :