छत्रपती संभाजीनगर Nylon Manja Sellers : काही वर्षांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर बाबा म्हणून ओळख निर्माण झालीय. तशीच काहीशी चर्चा छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याबद्दल होत आहे. कारण ही तसंच आहे, शहरात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांच्या दुकानात किंवा घरात मांजा आढळल्यास बुलडोझर फिरवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसंच गुंठेवारी नियमित न करणाऱ्यांबाबत देखील अशीच भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळं मनपा आयुक्तांची बुलडोझर बाबा नावानं चर्चा होत आहे.
मांजा विक्रीबाबत आयुक्तांची तंबी : सर्वत्र बंदी असलेल्या नायलॉन मांजाची शहरात सर्रास विक्री केली जातेय. रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांना 'या' नायलॉनमुळं दुखापत झालीय. याबाबत खंडपीठानं स्वतःहून दखल घेत सर्वत्र पोलिसांनी कारवाई करावी, असे निर्देश दिले होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध रित्या विक्री होत असलेल्या मांजाबाबत तपासणी सुरू केली आहे. त्यानंतर पोलिसांनी शहरात बारा जणांवर गुन्हे दाखल करत, 274 रिळ जप्त केल्याची माहिती न्यायालयात दिली. त्याचबरोबर नायलॉन मांजाचा ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या 19 कंपन्यांविरोधात नोटीस बजावल्याचं देखील न्यायालयात सांगण्यात आलं. तर दुसरीकडं महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या पथकांनी मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित करत कारवाईला सुरुवात केली आहे. या संदर्भात आत्तापर्यंत तीन आस्थापनांना सील लावण्यात आलं आहे. अशीच कारवाई पुढे देखील सुरू राहणार असून जे व्यावसायिक नायलॉन मांजा विक्री करतील, त्यांच्या दुकान, घरांवर बुलडोझर फिरवला जाईल, असा इशारा मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
मालमत्ता नियमित नसल्यास होणार कारवाई : गुंठेवारीमध्ये असलेल्या मालमत्ता नियमित करण्यासाठी महानगरपालिकेनं वेळोवेळी योजना राबवल्या. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळताना दिसून येत नाहीये. त्यामुळं आता प्रत्येक वसाहतीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. दिलेल्या मुदतीत मालमत्ता नियमित न केल्यास अशा घरांवर बुलडोझर फिरवणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. शहरातील 118 वसाहतीत 7 हजार 500 मालमत्ता नियमित करण्याच्या प्रक्रियेसाठी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्यापैकी फक्त चार हजार मालमत्ताधारकांनी प्रतिसाद दिला. अनधिकृत वसाहतींची संख्या वाढण्याची भीती या निमित्तानं निर्माण होत आहे. 2020 पर्यंतच्या मालमत्ता गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यास मंजुरी राज्य शासनानं दिली होती. त्यावर महानगरपालिकेनं लागणाऱ्या शुल्कात 50 टक्क्यांची सवलत देखील दिली होती. त्याला दहा हजर मालमत्ता धारकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र, अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप कुठलाही प्रतिसाद दिलेला नसल्यानं महानगरपालिका आयुक्तांनी सक्त कारवाईचे निर्देश देत, थेट बुलडोझर फिरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं शहराचे बुलडोझर बाबा अशी, ओळख मनपा आयुक्तांना नागरिक देताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा -