औरंगाबाद - लोकसभेचे अधिवेशन झाल्यानंतर औरंगाबाद महानगर पालिकेतील अनेक अधिकारी-पदाधिकारी घरी जातील. तर काही जण जेलमध्ये पण जातील, असे वक्तव्य औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी अवास्तव खर्च करत महानगर पालिकेची तिजोरी रिकामी केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महापौरांनी अवास्तव पैशाचा खर्च करून एक प्रकारे हा घोटाळा केल्याचा आरोप केला.
लोकसभेचे अधिवेशन संपू द्या, मग त्यानंतर एका-एका घोटाळ्याची कागदपत्रे काढू आणि अधिकारी पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये घालू असा इशारा जलील यांनी दिला. गेल्या वर्षभरामध्ये महानगरपालिका कंगाल असतानाही लाखो रुपयांचा केलेला खर्च हा घोटाळा असल्याचे जलील म्हणाले. महापौर बंगला, महापौरांचे दालन, चहापान, हारफुल, शाली घेण्यात महापौरांनी उधळपट्टी केली आहे. पालिकेत होणाऱ्या कार्यक्रमांचे चित्रकरण करण्यासाठी २० लाखांचा खर्च केल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी लावला आहे. महानगर पालिका ही महापौरांची मालमत्ता नाही, लोकसभा अधिवेशन झाल्यावर अजून घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी केला.