औरंगाबाद - कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेईल. माझा निर्णय २९ मार्चला जाहीर करेन, असे वक्तव्य काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांनी पक्षाविरोधात दोन दिवसांपूर्वीच बंडाचा पावित्रा घेतला होता. अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
सत्तार म्हणाले, की नेत्यांचे कोणी ऐकत नाही. तर आमचं काय. मी लहान कार्यकर्ता आहे. जे आहे त्यात मी समाधानी आहे. काँग्रेसने माझ्याशी चर्चा केली आहे. पक्ष मला उमेदवारी द्यायला तयार आहे, असे सत्तार म्हणाले. पुढचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलूनच घेईल. २९ तारखेला निर्णय जाहीर करेन असे सत्तार यांनी सांगितले. भाजपमध्ये जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी आमदार सुभाष झाम्बड यांच्या नावाची घोषणा काँग्रेस पक्षाने केली होती. या घोषणेमुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेतली.
आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही किंवा स्वतःचा पक्ष देखील काढणार नसल्याची माहिती सत्तार यांनी दिली. इतकेच नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्यावर काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची विचारणा केली आहे. यावर २९ तारखेला आमखास मैदानावर मेळावा घेऊन निर्णय घेऊ, असे अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली.