कन्नड (औरंगाबाद) - राजकारण सोडून शांत जीवन जगण्यासाठी पुणे येथे गेलो, तेथेही चुकीचे गुन्हे नोंदवून मला संपवण्याचा डाव रचण्यात आला. आता मी परत राजकारणात येणार असून जालना लोकसभेत रावसाहेब दानवे यांना पाडले नाही तर हर्षवर्धन नाव वापरणार नसल्याची घणाघाती टीका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड येथे मंगळवारी (ता. 09) केली. पुणे येथील कारागृहातून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी सहकारी इशा झा यांच्यासह शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
विजयी सरपंच व उपसरपंचांचा करणार सत्कार
ते म्हणाले, की पुणे येथील घटनेत खासदार दानवे यांच्या दबावात पोलिसांनी चुकीचा गुन्हा नोंदवला. मात्र माननीय उच्च न्यायालयाने सदर गुन्हा चुकीचा असल्याचे म्हटल्याने मला जामीन मिळाला. या आधीही माझ्या विरोधात दानवे यांनी चुकीचा अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला होता. नंतर वाद, भांडण नको म्हणून मी राजकारण सोडून शांततेत समाजकार्य करण्याचे ठरवले होते. मात्र दानवे हे मला जगू देत नाहीत. त्यामुळे आता मी पुन्हा राजकारणात येऊन त्यांना जालना लोकसभेत पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येत्या 18 तारखेपासून मी पुन्हा राजकारणात येण्याची सुरुवात करणार असून त्या दिवशी तालुक्यात विजयी सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करणार आहे, असे ते म्हणाले.
'मुलाविरोधात पॅनल कशासाठी?'
पत्नी संजना जाधव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की एखाद्या महिलेने पतीशी वाद असल्यास त्याच्याविरोधात राजकारण केल्याचे मी बघितले आहे. मात्र एखाद्या महिलेने आपल्या मुलाच्या विरोधात पॅनल उभे केल्याचे मी बघितले नाही. कन्नड तालुक्यातील झळकणाऱ्या बॅनरवरून संजना जाधव यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही. पती तुरुंगात असताना या महिलेने मुलाविरोधात पॅनल टाकले. कशासाठी हा अट्टहास तर आमदारकीसाठी. तोंडाने मागितली असती तर देऊन टाकली असती. एवढा खटाटोप कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
'प्रशासनावर वचक नाही'
पुढे ते म्हणाले, की खासदार दानवे यांनी विधानसभेत मला पाडण्यासाठी तत्कालीन मंत्री लोणीकर यांच्या जावयाला उभे केले. त्यामुळे मी पडलो. निवडून आलेल्या आमदारांचा प्रशासनावर वचक नसल्याने तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, तहसीलदार कोणीच काही ऐकत नाही. त्यामुळे खासदार दानवे यांनी माझेच नाही तर तालुक्याचेही नुकसान केले आहे, अशी टीका त्यांनी केली.