Police Chased And Caught The Criminal गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : देशी बनावटीचा गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस सोबत घेऊन फिरणाऱ्या व अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हव्या असलेल्या एका सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी तालुक्यातील जामगाव येथे कारखाना परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास एक किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेतलंय. महेश काळे असं आरोपीचं नाव असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
...अन् पोलिसांनी ताब्यात घेतलं : मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे जामगाव परिसरात गस्तीवर असताना त्यांना खबऱ्यांमार्फत या परिसरात सराईत गुन्हेगार महेश काशीनाथ काळे हा कमरेला कट्टा लावून फिरत असून तो सध्या साखर कारखाना परिसरात दारू पिण्यासाठी जात असल्याची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी रात्री दहाच्या सुमारास साखर कारखाना परिसरात सापळा लावला. त्यानंतर थोड्या वेळात आरोपी महेश काळे त्या परिसरातून जात असताना पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ताब्यात घेतलं.
कोण आहे महेश काळे? : आरोपी महेश काळे हा सराईत गुन्हेगार असून सन २०१६ ते आतापर्यंत त्याच्यावर गंगापूरसह अहमदनगर, वाळूज, वीरगाव येथील पोलिस ठाण्यात एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. प्राणघातक हल्ला करणे, चोरी, दरोडा, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे, विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे. यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी पाठलाग करून कारखान्यासमोरील जि. प. शाळेच्या मैदानात ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आढळला. त्यातील मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे व गावठी कट्ट्याच्या हँडलला कव्हर मिळाले. पोलिसांनी आरोपीजवळील मुद्देमाल जप्त केला. याबाबत सहायक फौजदार थोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश काशीनाथ काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले,फौजदार दिनकर थोरे, पो. कॉ. अमोल कांबळे, अभिजित डहाळे, अतुल भवर,विजय नागरे, तेनसिंग राठोड, राहुल वडमारे यांच्या पथकानं केली.
हेही वाचा -