ठाणे : उत्तर प्रदेशातील जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून, एका ओला चालकाची हत्या करण्यात आली आहे. अक्रम कुरेशी (वय २२) असं हत्या झालेल्या चालकाचं नाव आहे. आरोपीच्या प्रेयसीनं अक्रम कुरेशी सोबत प्रेमाचं नाटक करून त्याला निर्जनस्थळी भेटण्यासाठी बोलावलं होतं आणि हत्या केली होती. याप्रकरणी प्रेमाचं नाटक करणाऱ्या प्रेयसीसह पाच आरोपींना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दिली. जस्सी तिवारी, मोहम्मद कैफ मोहम्मद रफिक कुरेशी (वय २२), इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी (वय ३५), सलमान मो. शफिक खान (वय ३२), सुहेल अहमद कुरेशी (वय २८) हे पाचही आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील आहेत.
अज्ञातानं अशी केली हत्या : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला चालक अक्रम कुरेशी याचं आरोपी मोहम्मद कैफ सोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमिनीच्या वादातून जुलै 2022 मध्ये वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ याने आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली. तिनं अक्रम कुरेशीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तिनं १७ जानेवारी रोजी अक्रम कुरेशीला भेटीसाठी भिवंडी येथे बोलावून घेतलं. नियोजित स्थळी ती त्याच्यासोबत कारमध्ये बसून गेली होती. त्याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघांनी अक्रम कुरेशीवर लोखंडी रॉड आणि दगडानं हल्ला करून हत्या केल्याची माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एडके यांनी दिली
अशी झाली गुन्ह्याची उकल : घटनेचं गांभीर्य पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांनी दोन स्वतंत्र पथकं तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला. त्यावेळी घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ओला चालक हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून संशयित महिला जस्सी तिवारीला ताब्यात घेऊन तिच्याकडं कसून चौकशी केली. त्यावेळी या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं. जस्सी तिवारीकडं पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मोहम्मद कैफ मोहम्मद रफिक कुरेशी, इसामुद्दीन रियाजुद्दिन कुरेशी, सलमान मो. शफिक खान, सुहेल अहमद कुरेशी, ही नावे समोर येताच पोलीस पथकानं या चारही आरोपींना मौजे हैदरपूर, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश येथून अटक केली.
हेही वाचा -