सिल्लोड(औरंगाबाद)- औरंगाबादच्या सिल्लोड शहरातील एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर महिलेच्या घरातील 15 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरातील हरी मशीद परिसरातील एक वयोवृद्ध महिला पोटाच्या आजाराच्या उपचारासाठी गेल्या 10 मे पासून औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला.
महिलेच्या अहवालाची माहिती मिळताच सिल्लोड शहरातील तिचे घर रात्री उशिरा सॅनिटाईझ करण्यात आले. तिच्या घरातील 15 व्यक्तींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांचे रक्ताचे व स्वॅबचे नमुने आज घेतले जाणार आहेत. हा परिसर सिल्लोड नगर परिषदेच्यावतीने सील करण्यात आला आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे.
आजपासून लॉकडाऊन काळात सरकार कडून काही अटी शिथील करण्यात आल्या आहेत. आज पासून सिल्लोड शहरातील बाजारपेठ काही प्रमाणात सुरू झाली होती. अशातच महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये, याबाबत प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून व्यापारी व नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोरोनाबाबतीत असलेले सर्व नियम पाळावेत, सर्वांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन तहसीलदार रामेश्वर यांनी केले आहे.