औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा येथील रामेश्वर भुसारे या अल्पभूधारक शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण सुरू केले आहे. पॉली हाऊसचे अनुदान मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत.
हेही वाचा - चूक महसूल प्रशासनाची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना, नाशिकमधील प्रकार
२६ जानेवारीपासून कृषी विभागाविरोधात ते आंदोलन करत आहेत. भुसारे यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या शेतात कृषी विभागाच्या योजनेतून पॉली हाऊसची उभारणी केली. यासंदर्भात त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन साडेतीन लाख रुपये अनुदान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर लाटल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. या रखडलेल्या अनुदानासाठी अखेर त्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा - अखेर पपई उत्पादक अन् व्यापाऱ्यांमध्ये समन्वय, पपईला मिळणार 'एवढा' दर
कृषी आणि मंडळ अधिकाऱ्यांसह पिशोर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी भुसारे यांची भेट घेतली. मागण्यांसदर्भात कारवाई करण्यासाठी १५ दिवसांच्या कालावधीची त्यांची विनंती फेटाळून भुसारे यांनी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवले आहे.