औरंगाबाद - पैठण तालुक्यात खाम जळगाव शिवारात एका ६२ वर्षीय शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. देवराव किसन लाटे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
खाम जळगाव शिवारातील (गट.नं. ६) सखाराम रंगनाथ लाटे यांच्या मालकीच्या असलेल्या कपाशिच्या शेतात १६ मे रोजी दुपारी एक वाजेदरम्यान शेतकरी देवराव किसन लाटे (वय ६२) (रा. खाम जळगाव ता. पैठण) यांचा मृतदेह काही शेतकऱ्यांना आढळुन आला. शेतकऱ्यांनी ही माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी बिडकीन पोलिसांना खबर देऊन घटनेची माहिती दिली. माहीती मिळताच बिडकीन पोलीस ठाण्याचे फौजदार विठ्ठल आईटवार, पो.हे.कॉ. गोविंद राऊत, पो.कॉ. तुळशिराम गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतास बिडकीन ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषित केले. उन लागल्यामुळेच उष्मघाताने बळी गेला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बिडकीन ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनावरून उष्मघातामुळेच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत देवराव लाटे यांच्यावर खाम जळगाव येथील स्मशानभुमीत सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.