सिल्लोड (औरंगाबाद) - लॉकडाऊन काळात सामान्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सिल्लोड येथे 40 हजार गोरगरीब व गरजूंना घरपोच जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप सुरू करण्यात आले आहे. गुरुवार (दि. 29) रोजी अंधारी आणि पालोद जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावापासून शिवसैनिकांनी घरपोच जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप सुरू केले.
गरजूंना जीवनावश्यक वस्तू व किराणा किट वाटप -
गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात सिल्लोड शहरात जवळपास 10 हजार गरजूंना घरपोच जीवनावश्यक वस्तू व किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्यात गुरुवार (दि.29) पासून ग्रामीण भागातील 40 हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तू व किराणा किट वाटप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या लॉकडाऊन काळातही शिवसेनेच्यावतीन सिल्लोड येथे 1 लाख जीवनावश्यक वस्तू व किराणा किट, गरजूंना भाजीपाला, दूध, रस्त्याने पायी जाणाऱ्या कामगारांना जेवण व्यवस्था तसेच दररोज सकाळ व संध्याकाळ 1 हजार गरजूंना घरपोच जेवणाचे वाटप केले होते. गेल्या 14 एप्रिलरोजी राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा होताच शिवसेनेने शहरातील 10 हजार गरजूंना जीवनावश्यक वस्तू व किराणा किट वाटप केले.
कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही -
लॉकडाऊन काळात रेशन दुकानांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला मोफत धान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या या संकटात हातावर पोट असणाऱ्यांना रेशनसोबत काही जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किट देणे गरजेचे असल्याने आम्ही हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरात 10 हजार गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागातील 40 हजार गरजूंना किराणा किट व जीवनावश्यक वस्तू घरपोच वाटपाचा उपक्रम आजपासून हाती घेण्यात आला आहे. तसेच अधिक किराणा किट लागल्या, तरी त्या उपलब्ध करून दिल्या जाईल. मात्र, एकही गरजू व्यक्ती या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मतदार संघातील शिवसैनिक घेत आहेत, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात बोलताना दिली.
दानशुरांनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन -
कोरोनाचे संकट गंभीर आहे. सरकारच्या माध्यमातून राज्यातील रेशनकार्ड धारक कुटुंबांना मोफत धान्य देण्यात येत आहे. शिवभोजन थाली मोफत करण्यात आली आहे. निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्याचे वेतन त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. असे असले, तरी कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेता समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गोरगरिबांना आपल्या परीने मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - बारामतीत 'कलरफुल' कलिंगडांची चलती; सहा एकर क्षेत्रात १२० टन उत्पादन